मुंबई - पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून दिल्लीतील काही लोक टोमणे मारत असल्याचे दुःख जनतेसमोर मांडले होते. मात्र, हे धक्कादायक असून आपल्या पंतप्रधांनाचा अपमान कोण करेल, तो करण्यासाठी विरोधी पक्ष आपल्याच राज्यकर्त्यांनी शिल्लक ठेवला आहे का? असा सवाल करत विधायक टीका करणे, सरकारच्या खोटपणावर बोलणे याला जर राज्यकर्ते अपमान म्हणत असतील तर लोकशाहीचा विनाश जवळ आला असल्याची टीका शिवसेनेने भाजपावर केली आहे.
मोदी हे मोठे नेते आहेत. त्यांनी राहुल गांधी यांच्या टोमण्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. याउलट गेल्या सहा वर्षात भाजपच्या मंडळींनी राहुल गांधींना 'पप्पू' सारखे मारलेले टोमणे एकत्र केले तर एक ग्रंथ तयार होईल. तसेच पश्चिम बंगाल मध्ये ममता यांच्या बद्दल जी भाषा वापरली जाते , शरद पवारांवरही अधून मधून टीका केली जाते त्याला काय म्हणावे असा सवालही मोदी यांना शिवसेनेने केला आहे.
शेळ्यांवर राज्य करणे सोपे असते-
तसेच राजकारणात दोन द्यावे आणि दोन घ्यावे लागतात याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवायलाच हवी, असे सागंताना राज्य मिळाले आहे ते नीट चालवा; शेळ्यावर राज्य चालवणे सोपे असते असा सल्ला देत खोचक टोलाही लगावला आहे.
शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केंद्रातील सत्ताधारी भाजपावर कृषी आंदोलन, कोरोना परिस्थिती या सारख्या विषयांकडे लक्ष वेधत निशाणा साधला आहे. सरकार विरोधात कोण बोलत असेल म्हणून त्याची गळचेपी करणे किंवा अशा लोकाशी संवाद तोडणे म्हणजे लोकशाही नाही, हे सांगताना शिवसेनेने केंद्र सरकारच्या व्यवस्थेला आणि धोरणांना विरोध न कऱणाऱ्यांना शेळ्या मेंढ्या संबोधले आहे आणि त्याच शेळ्या मेंढ्या सरकार किंवा राजा करतो तेच बरोबर असे मानत आहेत. मात्र, मेंढपाळास या शेळ्या मेंढ्याची व्यवस्था लावणे सोपे असते, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
मन की बात कार्यक्रमातून मोदी आकशावाणी करतात म्हणजे त्यांना मन आहे. त्यांनी त्यांचे दुःख लोकांसमोर मांडले. त्यातही दिल्लीतील लोक मला सतत टोमणे मारतात, त्यांना लोकशाही शिकवायची आहे, असे ही मोदी म्हणाले होते. मात्र, एकीकडे काँग्रेसच्या नेतृत्वास गांभीर्याने घेत नाही असे म्हणणाऱ्यांनी राहूल गांधीच्या टोमण्यांना अपमान संबोधन म्हणजे हा पाचंट विनोद असल्याची टीका भाजपाच्या दुतोडी भूमिकेवर केली आहे.
तर लोकशाहीचा अंत जवळ आला आहे-
सरकारच्या खोटेपणावर बोलण्यास अपमान समजले जात असेल तर लोकशाहीचा अंत जवळ आला असल्याची टीका करत शिवसेनेने पुढे म्हटले आहे की, दिल्लीत थंडी वाऱ्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आक्रोश म्हणजे लोकशाहीचा आवाज नाही का? या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे. मोदी विरोधात बोलणाऱ्यांना दहशतवादी ठरवले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांना दिल्लीच्या वेशीवर धडकलेल्या शेतकऱ्यांबदद्ल त्यांना चिंता नाही, तीन चार भांडवलदारासाठी मोदी देश चालवत आहेत, असा टोमणा मारला होता. मात्र, गांधी यांच्या टोमण्यामध्ये तथ्य नाही का ? असा खडा सवाल शिवसेनेने मोदी यांना केला आहे.
लोकशाहीचे उदाहरण देताना जम्मू काश्मीरची जनता कोरोना काळात, थंडी वाऱ्यात लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानासाठी पोहोचली, असे म्हणत पंतप्रधानांनी जनतेचे आभार व्यक्त केले होते. मग दिल्लीच्या सीमेवर एक महिन्यापासून आंदोलन करणारे शेतकरी लोकशाहीचे मारेकरी आहेत असा चिखल उडविणे म्हणजे लोकशाही होत नाही, अशी टीकाही सामनातून केली आहे. मोदींना शेतकऱ्यांचे दुखणे आणि उपचार दोन्ही माहित आहे. मात्र, त्यांचे उपचार म्हणजे, दुखणे पोटाला आणि पाल्सर पायाला असे आहे, असा टोलाही शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवरून लगावला आहे.
मेंढपाळाला फक्त शेळ्यांची व्यवस्था करायची आहे-
सध्याच्या राजवटीत लोकांच्या शेळ्या झाल्या आहेत आणि त्या शेळ्याच मेंढपाळाने छान व्यवस्था केल्याचे सांगत आहेत. असे म्हणत मोदी भक्त आणि मोदींचे समर्थन करून नफा मिळवणाऱ्या दोन चार भांडवलदारांवरही सामनातून निशाणा साधला आहे. तसेच, शेळ्यांसाठी लावलेली व्यवस्था म्हणजे सर्व सुख सोयी नाहीत. मेंढपाळाला फक्त त्या शेळ्या झालेल्या लोकांची व्यवस्था करायची असेल तर त्या शेळ्या खुश होतील, तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, इतर वाघ, हत्ती सिंह, लांडग्यांनीही शेळ्या मेढ्या सारखे वागावे. आणि एखाद्या वाघाने गर्जना केली तर तो अपमान होतो. याला लोकशाही म्हणता येणार नाही. या उलट यालाच लोकशाही म्हणा, असा दबाब टाकणाऱ्यांनाच लोकशाही शिकवायची गरज असल्याचे परखड मत व्यक्त करत मोदींवर निशाणा साधला आहे.
चीनच्या घुसखोरीवर बोलले की टोमणा वाटतो-
पंतप्रधान मोदी जम्मूतील निवडणुकावर बोलतात. मात्र, लडाखमधील चिनच्या घुसखोरीवर बोलत नाहीत. त्यावर विरोधकांनी बोलले की त्यांना अपमान किंवा टोमणे वाटतात, अशी टीकाही शिवसेनेने केली आहे. तसेच मोदी आणि शाह यांच्याकडे बहुमताचे राज्य आहे. ईडी , सीबीआय़, आयकर या संस्था सरकारच्या रखवालदार आहेत. असे असताना या दोघांना कोणी टोमणा मारेल याची चिंता ते कशाला करत आहेत, असा खोचक टोला ही शिवसेनेने लगावला आहे.