मुंबई - आपल्या देशात राष्ट्रद्रोह इतका स्वस्त होईल असे वाटले नव्हते. स्वामीवर म्हणजे राजावर जो प्रेम करीत नाही तो राष्ट्रद्रोही या विचारावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आसुड ओढले आहेत. सरकारविरुद्ध, पंतप्रधान, राष्ट्रपतींविरोधात बोलायचे नाही. तसे केले तर सरकार उलथविण्याचा कट रचला म्हणून खटले दाखल होतील. या भीतीवर सर्वोच्च न्यायालयाने उतारा दिला आहे. आज राजनिष्ठा, स्वामीनिष्ठेपुढे देशभक्तीचे महत्त्व उरले नाही. राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही. चुका करणाऱ्य़ा राजाला सत्य, परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा, असल्याचे मत व्यक्त करत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रातील भाजपा सरकार आणि त्याच्या राजनिष्ठेच्या धोरणांवर आपल्या रोखठोक या सदरातून निशाणा साधला आहे.
देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या देशात त्याची गल्लत होत आहे. स्वामीनिष्ठा ही राजनिष्ठा असू शकते. पण त्यास देशभक्ती कसे म्हणाल? नताशा नरवाल, देवांगना कलिता या आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर मुक्त करताना सरकारच्या मनसुब्यांवर ताशेरे ओढले. सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतला म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच वेळी केरळ हायकोर्टाने लक्षद्वीप बेटावरील सिनेनिर्मात्या आयशा सुल्ताना यांनाही अंतरिम जामीन मंजूर केला. लक्षद्वीपच्या राजकीय प्रशासकांवर टीका केल्याबद्दल आयशा यांच्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता, ही सर्व उदाहरणे देत राऊत यांनी स्वामीनिष्ठा म्हणजे देशभक्ती नसल्याचा टोला सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाजपला लगावला आहे.
ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे-
अयोध्येत राममंदिराच्या जमीन खरेदीवरून वादंग माजले आहे. संजय सिंह हे आप पक्षाचे खासदार. त्यांनी एक प्रकरण समोर आणले. एक जमीन अयोध्येतील, जी दोन-पाच मिनिटांपूर्वी फक्त दोन कोटी रुपयांत खरेदी केली. त्याच जमिनीची किंमत पुढल्या पाच मिनिटाला 18 कोटी रुपये दाखवून राम जन्मभूमी न्यासाने खरेदी केली. हा राममंदिराचा जमीन घोटाळा असल्याचे संजय सिंह यांनी समोर आणला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केली. संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. धार्मिक स्थळांबाबत घोटाळय़ांची चौकशी करा असे सांगणाऱ्य़ांना राष्ट्रद्रोही म्हणणे ही विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नसल्याचेही परखड मत राऊत यांनी मांडले आहे.
वाद जुनाच !
देशनिष्ठा की राजनिष्ठा हा वाद सनातन काळापासून सुरूच आहे. आज जे नरेंद्र मोदींवर निष्ठा ठेवत नाहीत ते देशाचे नाहीत असे बोलले जाते. कधी काळी मोदींच्या जागी इंदिरा गांधी होत्या. 'इंदिरा इज इंडिया, इंदिरा म्हणजेच भारत' ही घोषणा त्याच राजनिष्ठेतून निर्माण झाली. त्याच इंदिरा गांधींचा पराभव 1978 साली हिंदुस्थानी मतदारांनी केला. इंदिरा हरल्या म्हणजे देश हरला, असे मानायचे काय? व्यक्ती येतात व जातात. देश तेथेच असतो. त्याचे कणखर पोलादी नेतृत्व राष्ट्रनिष्ठा घडवत असते. सत्य बोलणारे व राज्यकर्त्यांना आरसा दाखवणारे राष्ट्राचे शत्रू ठरवून तुरुंगात ढकलले जातात. हिंदुस्थानच्या विविध तुरुंगांत आज अशा कैद्यांचा आकडा नक्की किती आहे? असा सवालही राऊत यांनी केला आहे.
फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष जनरल द गॉल हे एक मानी स्वभावाचे गृहस्थ होते. दुसऱ्य़ा महायुद्ध काळात त्यांच्या सत्यवादाचा कस लागला. हिटलरच्या संभाव्य हल्ल्याच्या प्रतिकारार्थ तेव्हाच्या फ्रेंच सरकारने अब्जावधी रुपये खर्च करून मॅजिनो तटबंदी उभारली. ही तटबंदी अभेद्य आहे, असा डंका फ्रेंच सरकारी तज्ञ पिटत असतानाच द गॉलने एक पुस्तक लिहून मॅजिनो तटबंदी कशी कुचकामी आहे हे पुराव्यासह दाखवून दिले. फ्रेंच सरकार व लष्करी अधिकारी द गॉलवर भडकले व तो देशनिष्ठ नसल्याचा अपप्रचार सुरू केला, पण द गॉलचेच म्हणणे शंभर टक्के बरोबर होते. याचा अनुभव फ्रान्सने लगेच घेतला. जर्मन फौजांनी स्वारी केली. मॅजिनो तटबंदी जर्मन फौजेला चार दिवसही रोखू शकली नाही. द गॉलने सत्य सांगितले यापेक्षा राष्ट्रनिष्ठा दुसरी कोणती असू शकते? असा राष्ट्रनिष्ठेचा इतिहासातील दाखला देखील राऊत यांनी या सदरातून दिला आहे.
राष्ट्रनिष्ठा म्हणजे काय ते पहा-
''द गॉल हा मानी पुरुष होता. कोणत्याही अवस्थेत ते स्वतः दुय्यम दर्जा स्वीकारायला तयार नसत व आपल्या देशाचा अपमान सहन करीत नसत. परागंदा फ्रेंच सरकारचे नेते असतानाही ते प्रे. रुझवेल्ट, चर्चिल आदी बड्या राष्ट्रांच्या नेत्यांशी बरोबरीच्या नात्याने वागत. फ्रान्सला थोडासा कमीपणा येतो, असे दिसले की ते या बड्यांच्या बैठकीतून ताडताड पाय आपटीत बाहेर पडत! रुझवेल्ट म्हणत, हिटलर परवडला; पण मित्र म्हणूनदेखील द गॉल नको. ते खरेच. गॉल हे राजनिष्ठ, स्वामीनिष्ठ नव्हतेच. ते फक्त राष्ट्रनिष्ठ होते. म्हणून त्यांचा हा लढा होता., असे उदाहरण देत राऊत यांनी राष्ट्रनिष्ठेवर पंतप्रधान मोदींवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.''
'काळ'कर्त्यांचे विवेचन
शिवराम महादेव परांजपे हे 'काळ'कर्ते म्हणून प्रख्यात आहेत. 'काळ'मधील निबंध तेव्हा फार गाजले. देशभक्ती आणि राजनिष्ठेविषयी 'काळ'कर्त्यांनी एके ठिकाणी चांगले विवेचन केले आहे. ते म्हणतात, ''देशभक्ती ही थोरली बहीण आणि राजनिष्ठा ही धाकटी बहीण होय. देशभक्ती ही सगळय़ांच्याच मनामध्ये एकदम उत्पन्न होते. राजनिष्ठा लोकांच्या मनात उत्पन्न व्हावी अशी इच्छा राजाच्या मनात प्रथमतः उत्पन्न होते आणि नंतर तो भीती, दहशत, कायद्याच्या वगैरे हत्यारांचा वापर करून लोकांच्यात राजनिष्ठा उत्पन्न झाली आहे अशी आपल्या मनाची समजूत करून घेतो. देशभक्ती ही मनुष्याच्या मनात स्वाभाविकपणे उत्पन्न होते. राजनिष्ठा लोकांच्या मनामध्ये उत्पन्न करण्यासाठी जास्त कृत्रिम प्रयत्न करावे लागतात. एक नैसर्गिक आहे, दुसरी मारून मुटकून आणावी लागते. एक देशाच्या फायद्याची आहे, दुसरी एकाच व्यक्तीच्या फायद्याची आहे. स्पष्टच सांगायचे तर देश पहिला आणि राजा दुसरा. देशासाठी राजा. राजासाठी देश नव्हे. देशाची सुरक्षितता व देशाची व्यवस्था नीट रीतीने चालावी म्हणून राजा अस्तित्वात आला. राजाला आपला अंमल गाजविता यावा म्हणून देश अस्तित्वात आला असे नाही. राजांमध्येही वाईट आणि जुलमी राजे आहेतच. अशा वेळी जेव्हा त्या वाईट आणि जुलमी राजाच्या कृतीने देश बुडू लागतो. त्या वेळेला राजनिष्ठेला चिकटून राहणे म्हणजे उत्तम सद्गुण नव्हे. ती राष्ट्रनिष्ठा नाहीच नाही. देशभक्तांना सावरकर, टिळक, भगतसिंग यांच्याप्रमाणे मृत्युदंड किंवा तुरुंगच मिळतो. राजनिष्ठांना अनेकदा सत्तापदे, रावबहादूर, 'पद्मभूषण' किताबही मिळत गेले. लोकशाही प्रणालीतही 'राजे' 'स्वामी' व राजनिष्ठेलाच महत्त्व प्राप्त होते तेव्हा देशनिष्ठेची नौका हेलकावे खाऊ लागते.'' काळकर्ते परांजपे यांच्या या लेखाचा दाखला देत राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
राज्य अस्थिर कसे होईल ?
उगवत्या सूर्याचे पूजक हे राजनिष्ठच असतात. राष्ट्र संकटात असतानाही जे फक्त राजनिष्ठ म्हणून वावरतात त्यांच्यापासून राष्ट्राला खरा धोका आहे. आज राष्ट्रद्रोह म्हणजे नक्की काय? ते कुणीच सांगू शकत नाही. कोणत्याही सरकारच्या 'चुका' दाखवणे हा काही राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न ठरू शकत नाही. आंदोलनात भाग घेऊन सरकारविरुद्ध घोषणा देणे, त्याबद्दल राजद्रोह, दहशतवादासारखी कलमे लावून बेमुदत तुरुंगात टाकणे या 'राजनिष्ठेला'च कोणी राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती समजत असतील तर देश संकटात असल्याचेही मत राऊत यांनी आपल्या सदरातून मांडले आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा निसटता पराभव झाला. जो बायडन हे विजयी झाल्याचे अधिकृतपणे जाहीर होताच ट्रम्प यांचे शेकडो समर्थक अमेरिकेच्या संसदेत घुसून त्यांनी गोंधळ घातला. ही 'ट्रम्प' या व्यक्तीच्या प्रती दाखवलेली राजनिष्ठाच होती. त्या दिवशी जगातील सर्वात बुलंद लोकशाहीत राष्ट्रनिष्ठेचाही पराभव झाला. त्याचप्रमाणे राममंदिराच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी करणाऱ्य़ांना राष्ट्रद्रोही ठरवणे ही राजनिष्ठा आहे. महागाई, भ्रष्टाचार, आर्थिक बजबजपुरी, आरोग्यविषयक अराजक माजले असतानाही अशा सरकारची पाठराखण करणारे राजनिष्ठाच ठरतात. ते सर्व देशभक्तीत मोडत नसल्याचे म्हणत भाजपा आणि मोदी सरकारला आपल्या रोखठोक या सदरातून संजय राऊत यांनी फटकारे लगावले आहेत.