मुंबई - राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. मात्र, राज्यात सरकारने ज्या प्रकारे ही स्थिती हाताळली आहे, त्यामुळेच आता मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. दिल्ली आणि संपूर्ण देशालाही कोरोना आटोक्यात आणण्यासाठी 'महाराष्ट्र मॉडेल' प्रमाणेच चालावे लागेल असेही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गावातून निघत नाही असा आरोप विरोधकांकडून होत असतो, या आरोपांचा राऊत यांनी समाचार घेतला आहे. कोणत्याही युद्धात सेनापती हा प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन लढत नाही. तो वॉररुममध्ये बसून विजय मिळवून देतो. उद्धव ठाकरे यांनीही एकाच ठिकाणी बसून अगदी गावपातळीपर्यंत सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत की नाही, हे पाहिले. त्यामुळे राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. विरोधकांनी आता टीका करणे बंद करावे असा सल्लाही राऊत यांनी दिला आहे.
फडणवीस यांच्या पत्राचा गांभीर्याने विचार -
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहले होते. या पत्रातील अनेक सूचना उत्तम आहेत. राज्य सरकार त्याचा नक्कीच गांभीर्याने विचार करेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
कोरोना संकटामुळे देश 20 वर्षे मागे -
गेल्या पाच-दहा वर्षात देश किती पुढे गेला हे माहिती नाही. मात्र, कोरोना संकटामुळे देश 20 वर्षे मागे गेला आहे. देशातील अनेक यंत्रणा कोलमडून पडल्या असून आता अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
रेमडेसिवीर इंजेक्शन्स सरकारच्या माध्यमातूनच गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत -
सध्या राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार होताना दिसत आहे. हा काळाबाजार सरकार करत नाही. तरीही रेमडेसिवीर इंजेक्शन्स ही सरकारच्या माध्यमातूनच गरजू लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.