मुंबई : काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी परमबीर सिंग यांच्यावर अजून कारवाई का केली नाही असा सवाल विचारत गृहमंत्री अनिल देशमुखांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता असे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात लावलेल्या कडक निर्बंधांचे स्वागत करताना यात काही त्रुटी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महिना उलटूनही सिंगांवर कारवाई का नाही
सध्या महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे मान्य करताना गृहमंत्र्यांवर आरोप करून महिना उलटला तरी परमबीर सिंग यांच्यावर कारवाई का केली नाही असे निरुपम यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर असून गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे होता असेही निरुपम यांनी म्हटले आहे.
नियमांमध्ये काही त्रुटी
महाराष्ट्रात राज्य सरकारने लावलेले निर्बंध काही प्रमाणात आवश्यक असून, काही ठिकाणी याचा उपयोग होईल. मात्र गरीब आणि मजुरांना या निर्बंधांचा तितकासा फायदा होणार नाही असे निरुपम म्हणाले. हॉटेल व्यवसाय हा रात्री आठनंतर बंद करण्यासाठी सरकारने सांगितले आहे. ही चुकीची भूमिका आहे. हॉटेल व्यावसायिकांना कामगारांना देण्यासाठी मुबलक प्रमाणात पैसेही यामुळे उपलब्ध होणार नाही असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जगातील सद्यस्थिती सांगितली त्याप्रमाणे त्यांनी आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यातील नियम व कार्यप्रणालीही पाहणे गरजेचे आहे असे निरुपम म्हणाले. ओडिशामध्ये नाईट कर्फ्यू रात्री दहानंतर लागतो. तर आपल्या महाराष्ट्रात हा नाईट कर्फ्यू आठनंतर लागतो. म्हणून आपल्या महाराष्ट्रातही अशा प्रकारे विचार करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण केले पाहिजे. नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे आणि सरकारने एकत्र येऊन लॉकडाऊनविषयी आणखीन कठोर नियम बनविले पाहिजे असे निरुपम म्हणाले.
हेही वाचा - नियम मोडल्यास कार्यालय वर्षभरासाठी बंद, वाचा आजपासून काय सुरु काय बंद