मुंबई - मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नवी मुंबई येथील बार आणि रेस्टॉरंटचे अनधिकृत परवाने प्रकरणी वानखेडे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कथित फसव्या बार परवान्याविरोधातील ठाणे पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेववर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ठाण्यातील कोपरी पोलिसांनी वानखेडे यांना समन्स काढले आहे. त्यांना आज चौकशीसाठी पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले आहे. त्यामुळे आज नेमके काय घडते याची उत्सुकता आहे.
काय आहे प्रकरण?
समीर वानखेडे यांचे पिता ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढले होते. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावाने हे परमीट घेण्यात आले. त्यावेळी समीर यांचं वय 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस होते. वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होते. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे सद्गुरू बार आहे. या बारचं परमीट नूतनीकरणही करण्यात आले आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या बारचं परमीट नूतनीकरण करण्यात आलं आहे. हा बार आणि रेस्टॉरंट आहे असंही नवाब मलिक यांनी सांगितले होते.
ठाणे पोलिसांकडून समन्स
याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलिसांनी समीर वानखेडेंना जवाब नोंदवण्यासाठी कागदपत्रांसह उद्या बोलावलं आहे.
तातडीची सुनावणी नाही -
समीर वानखेडे यांच्या ठाण्यातील एफआयआर रद्द करणारी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार देत न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. समीर वानखेडेंनी काल सादर केलेली याचिका आज बोर्डावर कशी आली? असा प्रश्न न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जमादार यांनी कोर्ट स्टाफ आणि वानखेडेंच्या वकिलांना केला. तसेच याचिकाकर्ते प्रतिभावंत व्यक्ती आहेत म्हणून त्यांना इथं झुकतं माप दिलं जाणार नाही तसेच प्रसार माध्यामात या विषयाची चर्चा आहे म्हणुन तातडीने आम्ही सुनावणी करणार नाही. याचिकेसंदर्भातील तांत्रिक बाबींची पूर्तता करून सुनावणी करणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.