मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स बजावण्याच्या तयारीत आहेत. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांमधील काही कर्मचारी आपल्यावर पाळत ठेवत आहेत, अशी तक्रार केली होती. त्यासंदर्भात जबाब नोंदविण्यासाठी मुंबई पोलीस समीर वानखेडे यांना समन्स बजावणार आहे.
चौकशी केली जाणार
काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांतर्फे आपला पाठलाग होत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यासंदर्भात पोलीस महासंचालक संजय पांडेंना रीतसर तक्रारही दाखल केली होती. त्याच तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना समन्स पाठवले जाणार आहे. तक्रारीचा भाग म्हणून समीर वानखेडेंची चौकशी केली जाणार आहे.
'माझ्यावर दबाव टाकला जात आहे'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या जावयाला एनसीबीने फसवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर एनसीबी कार्यालयाखाली पत्रकारांशी बोलताना ही समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे काही होईल ते कोर्टात समोर येईल, याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. करण सजनानी याला समीर खान याने आर्थिक मदत केली होती. करण सजनानीकडे जे सॅम्पल मिळाले त्यातील 18 पैकी 11 सॅम्पलमध्ये गांजा आढळून आलेला नाही. इतर सॅम्पलमध्ये गांजा आढळून आला आहे. कोर्टात जो रिपोर्ट दिला आहे तो वाचून घ्या असे सांगत माझ्यावर दबाव टाकला जात आहे, अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिली आहे.