मुंबई - संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा खासदारकीसाठी आपली इच्छा व्यक्त करीत अपक्ष उभे राहणार असल्याची घोषणा केली. त्यासाठी राजकीय पक्षांनी आपल्याला मदत करावी. विशेषता मराठा आमदारांनी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र राजकारणामध्ये कोणीही तुम्हाला सदिच्छा म्हणून मदत करत नाही. तर प्रत्येक पक्षाची राजकीय गरज असते आणि प्रत्येक पक्ष आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो. त्या दृष्टीने राजकीय पक्ष आपापली मोर्चे बांधणी करीत असतात. म्हणूनच संभाजीराजे यांच्या या आवाहनाला राजकीय पक्षांनी अद्याप उघडपणे पाठिंबा दिलेला नाही. शरद पवार यांनी पाठिंबा देऊन केला असला तरी शिवसेनेच्या मदतीविना हे शक्य नाही आणि शिवसेनेला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी बांधील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुळात छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या घराण्याला राजकारण की समाजकारण हा पूर्वा पार पडलेला प्रश्न आहे. काही विशिष्ट गोष्टींसाठी त्यांना राजकारणात यायचे आहे मात्र त्यात सोबत राजा म्हणून समाजकारणातही राहायचे आहे या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी लागणारी तयारी मात्र त्यांच्याकडे नाही हेच आतापर्यंतच्या राजकारणावरून सिद्ध झाले आहे. याशिवाय राजघराण्याकडे परंपरागत असलेल्या शेकडो एकर जमिनीची मालकी आहे. या जमिनींसाठी राजांना राजकारणात सक्रिय राहायचे आहे का? अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
काय आहे संभाजीराजे यांच्या घराण्याचा राजकीय इतिहास? - संभाजीराजे छत्रपती यांचे वडील आणि विद्यमान शाहू महाराज यांनी 1990 च्या सुमारास राजकारणाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात आरएस पाटील यांच्या प्रचार सभांना हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी 1995 नंतर युती सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेशही केला. मात्र मितभाषी आणि मवाळ स्वभावाचा असलेल्या शाहू महाराज यांना राजकारणाची गती पकडता आली नाही आणि त्यांनी केव्हा राजकारणातून निवृत्ती घेतली, हेही लक्षात आले नाही.
मालोजी राजे आमदार झाले - शाहू राजे यांचे धाकटे पुत्र मालोजीराजे यांनी मात्र समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सक्रियपणे भाग घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली होती. मात्र 2004 च्या निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेल्याने त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. राजकारणातला नवीन आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारांकडे पाठ फिरवली. त्यामुळे 2009 च्या निवडणुकीमध्ये मतदारांनी ही त्यांच्याकडे पाठ फिरवत राजेश क्षीरसागर या शिवसेनेच्या उमेदवाराला संधी दिली.
संभाजीराजे राष्ट्रवादीचे उमेदवार - 2009 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निलंबित केलेल्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र राजकारणात कसलेल्या आणि मुरलेल्या सदाशिवराव मंडलिक यांच्यापुढे संभाजीराजे यांचा निभाव लागला नाही आणि ते पराभूत झाले. राजकारणातील पराभवामुळे खचून न जाता राजकारणात टिकले पाहिजे हे ठाऊक नसलेल्या संभाजीराजे यांनी सक्रिय राजकारणाकडे दुर्लक्ष केले.
राजघराण्याचे राजकारण संपुष्टात - 2009 नंतर राजघराण्याचे राजकारण आणि समाजकारण जवळपास संपुष्टात आले होते. संभाजीराजे आणि मालोजीराजे यांनी समाजकारणामध्ये छोटे-मोठे उपक्रम घेतले असले. तरी प्रत्यक्षात राजकारणामध्ये त्यांना गती घेता आली नाही. त्याचवेळी साताऱ्यातील उदयनराजे आणि शिवेंद्रराजे मात्र राजकारणामध्ये सातत्याने यशस्वी होत होते.
राष्ट्रपती नियुक्त खासदार पदी संभाजीराजे - अखेरीस राष्ट्रपती नियुक्त खासदार पदासाठी संभाजीराजे छत्रपती यांची नावाची शिफारस भाजपाच्यावतीने करण्यात आली. त्यामुळे संभाजीराजे भाजप पुरस्कृत खासदार राहिले. खासदारकी दरम्यान, त्यांनी राजकीयदृष्ट्या कोणतेही ठोस कार्य केल्याचे दिसत नाही. केवळ मराठा समाजाला एक नवीन नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःला प्रस्थापित करण्याचा केलेला प्रयत्न हीच एक जमेची बाजू. असे राजकीय विश्लेषकांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
संभाजीराजे यांनी आपला आब राखावा - आप : संभाजीराजे यांनी राजकारण करताना सर्व पक्षांना आवाहन करून मराठा समाजाच्या हितासाठी निर्णय घ्यावा. वास्तविक राज घराण्यातील व्यक्तीचा आदर करत सर्व पक्षांनी संभाजीराजे यांना मदत करावी असे मत आम आदमी पक्षाचे महासचिव धनंजय शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
राजांनी नेटके समाजकारण करावे - देसाई : छत्रपती संभाजीराजे यांनी आधी नेटके समाजकारण करावे. त्यांचा उडालेला राजकीय गोंधळ थांबवण्यासाठी त्यांनी राजघराण्याच्या प्रतिष्ठेप्रमाणे सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करावे. कोण्या एका पक्षाला बांधून घेण्यापेक्षा त्यांनी योजल्याप्रमाणे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करावी, आणि त्याच माध्यमातून राजकारण करावे. राजकारणामध्ये जाण्यासाठी जनहित हाच जर त्यांचा उद्देश असेल तर तो स्वराज्य संघटनेच्या माध्यमातूनही साध्य करता येईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव दत्ताजी देसाई यांनी व्यक्त केले आहे. तसेच राजघराण्यातील व्यक्तीला नेमके राजकारणात कशासाठी जायचे आहे, याचे अनेक पैलू आहेत. त्यांना काही वैयक्तिक स्वार्थाच्या गोष्टी साध्य करायच्या आहेत का? असा सवालही उपस्थित केला जात असल्याकडे देसाई यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा - Afzalkhan Tomb Controversy : छत्रपतींनी कोथळा काढलेल्या अफझलखानाच्या कबरीवरुन वाद, कडक सुरक्षा तैनात