मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर येणार आहेत. सर्वप्रथम ते अहमदाबादला जाणार असून तिथे 'केम छो ट्रम्प' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावर होणारा खर्च आणि अहमदाबादमधील गरिबी ट्रम्प यांच्या नजरेस पडू नये म्हणून उभारण्यात येत असलेल्या 'तटबंदी'वरुन 'सामना'तून निशाणा साधण्यात आला आहे.
भारत पारतंत्र्यांत असताना इंग्लंडचे राजा आणि राणी यांच्या दौऱ्यावेळी जी लगीनघाई होत असे आणि जनतेच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात होता, तसलीच 'गुलाम' मानसिकता मि. ट्रम्प किंवा प्रे. ट्रम्प यांच्याबाबतीत घडत असल्याचे शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून म्हटले आहे.
सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही बाबा! 'मौका पडे तो गधे को भी बाप कहना पडता है' ही जगाची रीत असल्याचे सांगत सामनामध्ये म्हटले आहे की, ट्रम्प हे कोणी जगाचे 'धर्मराज' किंवा 'मि.सत्यवादी' नक्कीच नाहीत. ट्रम्प हे बलशाली अमेरिकेचे सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत इतकेच. ट्रम्प हे काही फार मोठे बुद्धीवादी, प्रशासक, जगाच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत काय? असा प्रश्न उपस्थित करुन नक्कीच नाहीत, असे अग्रलेखात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प तीन तासांसाठी अहमदाबाद भेटीवर येणार आहेत. त्यासाठी सरकारी तिजोरीतून अहमदाबादमध्ये शंभर कोटींवर खर्च होत असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे. मोदींवर निशाणा साधताना अग्रलेखात म्हटले आहे, की गंमत अशी की, प्रे. ट्रम्प यांना अहमदाबादच्या रस्त्यांच्या कडेला असलेल्या बकाल गरीबांच्या झोपड्यांचे दर्शन होऊ नये म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूला 'गडकोट' किल्ल्यास तटबंदी असावी तशा भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. ट्रम्प यांना देशाची दुसरी बाजू दिसू नये यासाठी काय हा खटोटोप? प्रश्न इतकाच आहे, मोदी हे सगळ्यात मोठे 'विकासपुरुष' आहेत. मोदी हे पंधरा वर्षे गुजरात राज्याचे 'बडा प्रधान' व आता पाच वर्षे संपूर्ण देशाचे 'बडा प्रधान' असतानाही गुजरातची गरिबी आणि बकालपण लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की का यावी? असा सवाल सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.
काँग्रेसचा उल्लेख टाळत अग्रलेखात म्हटले आहे की, 'गरिबी हटाव' या घोषणेवरुन बरीच टिंगलटवाली झाली होती. त्याच घोषणेचे रुपांतर आता 'गरिबी छुपाव' योजनेत झालेले दिसते, असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.