मुंबई - वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे मुंबईसह राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या काळात गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली असून रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म रेल्वे तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहेत.
गर्दी नियंत्रणासाठी घेतला निर्णय -
राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. परंतु रेल्वे प्रवासी वारंवार नियमाचे उल्लंघन करत आहेत. याशिवाय कोरोनाचा धोका मुंबईत अधिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोनाचा प्रादुर्भावावर आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने मुंबई विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकावरील प्लेटफॉर्म रेल्वे तिकीट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर टर्मिनस, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण आणि पनवेल स्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.
हे ही वाचा - वाझे आणि शिंदेची गुप्त बैठक, मिरा रोड-वसई फार्महाऊसवर कामांची वाटणी
50 विशेष रेल्वे गाड्या -
उन्हाळ्याचा हंगाम असल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी रेल्वे स्थानकावर होत असते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून मध्य रेल्वेने आतापर्यंत 50 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व प्रवाशांनी रेल्वे प्रवासादरम्यान कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.