मुंबई : कोरोनाच्या प्रतिबंधक नियमांविषयी मुख्यमंत्र्यांची भूमिका अतिशय कठोर असून पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. बुधवारी मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.
सरकार कायद्याचे पालन करेल
वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीविषयी विचारणा करण्यात आली असता संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पोहरादेवी येथे नियमांचे उल्लंघन झाले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उद्धव ठाकरे हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. ते आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारकडून कायद्याचे पालन केले जाईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला लोकशाही नसेल तर देश नसेलगुजरातमधील सुरत महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून आपची एन्ट्री झाली आहे. याबाबत काँग्रेसने विचार करायला हवा की, लोकांनी का नाकारलं? काँग्रेसचं पतन होणं योग्य नाही. पुद्दुचेरी, राजस्थानमधून सत्ता गेली. आमदारांची संख्या पुद्दुचेरी येथे कमी आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही अनेक प्रकारे दबावतंत्राचा वापर करण्यात आला. मात्र महाराष्ट्रात शिवसेना दोन्ही पक्षांसह मजबुतीने उभी आहे आणि पुढे चालली आहे. आज दिल्लीत बसलेले लोक सत्ता आणि पैसा यांचा गैरवापर करीत आहेत. हे योग्य नाही. देशात विरोधक नसतील तर लोकशाही नसेल, आणि लोकशाही नसेल तर देश नसेल असे राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यातील चर्चा बाहेर येत नाहीवनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे झालेल्या शक्ती प्रदर्शनावर शरद पवार नाराज असल्याची चर्चा सकाळपासून सुरू आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मला कल्पना नाही. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात ज्या चर्चा होतात त्या बाहेर येत नाही. त्यांचा अंदाज अपना अपना असतो असे राऊत म्हणाले.