मुंबई - प्रवाशांकडून नेमून दिलेल्या भाड्याहून अधिक तिकिट दर आकारणाऱ्या ( charging extra rates ) वाहतुकदारांवर परिवहन विभागाने कारवाई सुरु केली आहे. परिवहन विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी ( RTO ) राज्यभर ६ हजार ६१० वाहनांची झडती घेतली असता, जादा दर आकारणाऱ्या १०३ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पनवेल आणि ठाण्यात ( Panvel and Thane ) सर्वाधिक लुटारू वाहतुकदार असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशी केली कारवाई
परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील ६ हजार ६१० वाहनांची झडती घेण्यात आली. त्यात १०३ वाहतुकदारांकडून प्रवाशांची आर्थिक लूट सुरु असल्याचे निदर्शास आले. त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. याशिवाय १ हजार ४१८ वाहनांविरोधात इतर नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मागील पाच दिवसांत परिवहन विभागाने एकूण २२ लाख १९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.दरम्यान, मुंबई, पश्चिम उपनगर, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी १००हून अधिक वाहनांची तपासणी केल्यानंतर एकही वाहतुकदाराने जादा दर आकारल्याचे दिसले नाही. याउलट पनवेल, ठाणे आणि अमरावती येथे जादा दरासह इतर नियमांचा भंग केलेल्या वाहनांची संख्या अधिक होती, अशी माहिती परिवहन विभागाने दिली.
हेही वाचा : Konkani Travelers Mumbai : एसटीचा संप अन् कमी रेल्वे गाड्यांमुळे कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे हाल..
कारवाई करण्याचे दिले होते निर्देश
होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी जात असतात. एसटी महामंडळाचा संप काही ठिकाणी आद्यप सुरू असल्याने खासगी बसेस प्रवाशांची अडवणूक करुन अधिक दर आकारत आहेत. अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची परिवहनमंत्री यांनी तातडीने दखल घेवून याबाबत परिवहन आयुक्त यांनी तपास पथक नेमून कारवाई करावी, असे आदेश परिवहन मंत्री यांनी दिले होते. त्यानूसार ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : Hello RTO Help Desk In Chandrapur : चंद्रपुरात उपप्रादेशिक परिवहन विभागाचा 'हॅलो आरटीओ मदत कक्ष'