मुंबई- भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनळ याच्या विरोधात नाशिक पोलीस दलात कार्यरत असलेल्या त्याच्या पत्नीने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर दत्तू भोकनळ याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, या विरोधात उच्च न्यायालयाकडून दत्तू भोकनळ यास दिलासा मिळाला आहे.
त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याविरोधात दत्तू भोकनळ याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दत्तूच्या बायकोने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हणत गुन्हा रद्द केला आहे.
आपल्या तक्रारीत या महिलेने म्हटले होते, की डिसेंबर 2017 ते मार्च 2019 या दरम्यान दत्तू व तिच्यात प्रेमसंबंध होते. या दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांना न सांगता लग्न सुद्धा केले होते. मात्र, घरच्यांसमोर पुन्हा लग्न करण्यास दत्तू टाळाटाळ करत असल्याने सदर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दत्तूवर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मात्र, या विरोधात उच्च न्यायालयातून दत्तू भोकनळ यास दिलासा मिळाला आहे.