मुंबई : मुंबईकरांना परिवहन सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने गेल्या महिनाभरापूर्वी आपले काही मार्ग बंद केले आहेत. तर काही मार्ग खंडित केले आहेत. यामुळे प्रवाशांना आपला प्रवास करताना दोन ते तीन वेळा बस बदलून प्रवास करावा लागत आहे. त्यासाठी अधिक खर्च होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. भाडेतत्वावरील बस देणाऱ्या कंत्राटदाराच्या सोयीसाठी बसमार्ग बंद करण्यात आल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.
बेस्ट मुंबईकरांची लाईफलाईन -
मुंबईकर सर्वसामान्य प्रवासी प्रवास करण्यासाठी रेल्वे आणि बेस्टचा वापर करतात. मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. त्यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली. रेल्वे बंद झाल्याने अत्यावश्यक व फ्रंटलाईन सेवेतील कर्मचाऱ्यांना ने आण करण्याची जबाबदारी बेस्टवर आली. मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा असल्याने बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे गेल्या दीड वर्षात बेस्ट मुंबईकरांची पहिली लाईफलाईन बनली आहे.
बेस्ट मार्ग बंद, प्रवाशांना भुर्दंड -
बेस्ट प्रवाशांची पहिली लाईफलाईन झाली असताना सप्टेंबर महिन्यात प्रशासनाने अचानक २३ मार्ग बंद केले आहेत. ४५ मार्गावरील बस मध्येच खंडित केल्या आहेत तर फक्त ६ मार्गांचा विस्तार केला आहे. बस मार्ग बंद तसेच खंडित केल्याने लांब जाणाऱ्या किंवा आपल्या इच्छित स्थळी जाणाऱ्या प्रवाशांना दोन ते तीन बस बदली करून प्रवास करावा लागत आहे. यामुळे आधी जितके तिकीटाला खर्च होत होता, त्याच्या दुप्पट ते तिप्पट रक्कम तिकिटासाठी खर्च करावी लागत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तसेच प्रवासादरम्यान बसची वाट बघण्यात वेळही वाया जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.
प्रवाशांना वेठीस धरले -
बेस्ट प्रशासनाने बस मार्ग खंडित करताना नियोजन केलेले नाही. वर्षानुवर्षे सरु असलेले मार्ग बंद करण्यात आले आहेत. बस मार्ग खंडित आणि बंद करून प्रशासनाने प्रवाशांची नाराजी ओढवून घेतली आहे. भाडेतत्त्वावरील बसेस चालाव्यात म्हणून त्यांच्या सोयीप्रमाणे बस मार्ग चालवून प्रवाशांना वेठीस धरण्यात आले असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांनी दिली आहे.
बेस्टमध्ये आवाज उचलू -
महिनाभरापूर्वी बस मार्ग बंद करताना यावर चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही आढावा घेऊन बस मार्ग पुन्हा सूरु करू असे सांगण्यात आले आहे. अद्याप यावर प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यासाठी येत्या बेस्ट समितीच्या बैठकीत आवाज उचलू असे पालिकेतील विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य रवी राजा यांनी सांगितले.
सुचनांची दखल -
बस मार्ग बंद आणि खंडित करण्यावर बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. त्यावर प्रवाशांनी आपल्या सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेस्टच्या परिवहन विभागाचा ई मेल आणि टोल फ्री क्रमांकावर सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेस्टच्या ट्रॅफिक विभागाच्या मेलवर या सूचना येत आहेत. याठिकाणी तीन शिफ्टमध्ये सुचनांची दखल घेतली जात असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.