मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी केल्यानंतर या संदर्भात रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. शोविक चक्रवर्ती हा सुशांत सोबत 'फ्रंट इंडिया वर्ल्ड फाऊंडेशन' या सेवाभावी संस्थेवर संचालक म्हणून होता. ही कंपनी 6 जानेवारी 2020 रोजी सुरू केली होती. केवळ याच कंपनीवर शोविक सुशांत सोबत संचालक नव्हता, तर 12 सप्टेंबर 2019 रोजी स्थापन करण्यात आलेल्या 'विविद्रीग रिअलिटी प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीत सुशांत, रिया चक्रवर्तीसोबत शोविकचे नाव संचालकपदी आहे.
सुशांतसिंहचे चार वेगवेगळ्या बँकेत खाते होते. या चार बँकांच्या माध्यमातून सुशांतकडे तब्बल 18 कोटी रुपये असल्याचे पुरावे आहेत. मात्र यानंतर जवळपास 15 कोटी रुपये वेगवेगळ्या खात्यात वळवण्यात आले. सुशांतच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, शोविक चक्रवर्ती व रिया चक्रवर्ती या दोघांनी कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अफरातफर करून लाभ मिळवला आहे. याच मुद्द्यावर ईडीकडून सध्या तपास सुरू आहे.
2019 मध्ये रिया चक्रवर्तीने मुंबई उपनगरात एक फ्लॅट विकत घेतला होता. त्यासाठी तिने स्वत:च्या बचतीतील 25 लाख देऊन उर्वरित रक्कमेचे कर्ज घेतले होते.
मी कधीही सुशांतच्या पैशांचा वापर स्वतःसाठी केला नसल्याचे तिने ईडीच्या चौकशीत सांगितले. रिया ईडी कार्यालयात आल्यानंतर तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे कागदपत्र नव्हते. आयटी रिटर्न कागदपत्रे, बँक स्टेटमेंट यांसारख्या गोष्टी तिच्याजवळ नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने रिया चक्रवर्तीकडे गेल्या 5 वर्षांच्या आयटी रिटर्नच्या कागदपत्रांची मागणी केली आहे.