मुंबई - आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी आघाडी आणि युती करण्यापेक्षा एकला चलोचा नारा दिला आहे. निवडणुका वर्षभरावर आल्या तरी कोण कोणत्या पक्षाशी युती, आघाडी करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी सत्तेत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आताच आघाडी झाली नाही तर शेवटच्या क्षणी कार्यकर्त्यांना इतर पक्षांशी जुळवून घेताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
आघाडीला पोषक वातावरण -
राज्यात कित्तेक वर्षं मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि भाजपाची युती मागील वर्षी तुटली. भाजपाशी युती तुटल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सोबत महाविकास आघाडी करत राज्यात सरकार स्थापन केले. राज्यात महाविकास आघाडी सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. याच दरम्यान झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. याच दरम्यान येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचा अहवाल राज्य गुप्तचर विभागाने दिला आहे.
पालिकेत अद्याप आघाडी नाही-
महाविकास आघाडीला येत्या निवडणुकीत पोषक वातावरण असले तरी त्यामधील पक्ष मात्र निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेत आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. राज्यात आघाडी असली तरी पालिकेत अद्याप आघाडी झाली नसल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष हे विरोधी पक्षात आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याची चर्चा सुरू करण्यात आली होती.
![https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-bmc-election-7205149_30122020022638_3012f_1609275398_1085.jpg](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-bmc-election-7205149_30122020022638_3012f_1609275398_1085.jpg)
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाविकास आघाडीमधील पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. तर निवडणूक स्वबळावर लढवायची की आघाडी करून लढवायची याचा निर्णय काँग्रेसचे पक्ष श्रेष्ठी, राज्यातील नेते, मुंबई अध्यक्ष घेतील. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील त्याची अंमलबजावणी आम्ही पालिकेत करू, असे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.