मुंबई - महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही तर अद्वितीय राज्य असून देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे, या राहुल गांधी यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. केंद्र सरकारने तत्काळ महाराष्ट्राला आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. महसुली उत्पन्नात मोठी घट झाली आहे. राहुल गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र हे देशाच्या आर्थिक विकासाचे आणि रोजगाराचे केंद्र आहे. पण, केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्ये जी अडचणीत आली आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. महाराष्ट्रासह इतर राज्ये कोरोनाचा मुकाबला करत आहेत, त्यांना केंद्र सरकारने भरीव मदत केलीच पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असे थोरात म्हणाले.
एकेठिकाणी भाजप नेतृत्व महाराष्ट्राचे आर्थिक महत्त्व कमी करून महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय वित्तीय केंद्र (आयएफएससी) सारखे अनेक प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जात आहे. तर दुसरीकडे काँग्रसचे नेते प्रत्येक राज्याचे महत्त्व जाणतात. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान किती मोठे आहे, याची जाणीव काँग्रेस नेतृत्वाला आहे. गेल्या 70 वर्षात देशाचे नेतृत्व केलेल्या सर्व काँग्रेस नेत्यांनी सर्व राज्यांकडे समदृष्टीने पाहिले, पण दुर्दैवाने सध्याच्या भाजप नेतृत्वाकडून गेल्या सहा वर्षात न्याय भूमिका घेतली गेली नाही, अशी भावना थोरात यांनी व्यक्त केली.
याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील स्थलांतरित मजूर, गरीब, मध्यमवर्ग, ज्येष्ठ नागरिक यांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करण्याच्या केलेल्या मागणीचा केंद्र सरकारने विचार केलाच पाहिजे, यातूनच देशात मागणी वाढून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे थोरात म्हणाले.