मुंबई- मराठा समाजातील तरुणांच्या विविध विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुण्यातील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील निवृत्त सनदी अधिकार्यांची संचालक म्हणून वर्णी लावण्यात आली आहे. तसेच या संस्थेच्या कामकाजात इतरांचा हस्तक्षेप राहू नये म्हणून सरकारकडून सारथीला स्वायत्ततेचा दर्जाही देण्यात आला आहे. यासाठीचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे.
सारथीला स्वायत्तता देण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली हेाती. तसेच सारथी संस्थेवर मराठा समाजातील व्यक्तींची नेमणूक करावी अशीही मागणी अलिकडे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान केली होती. त्यापार्श्वभूमीवर सरकारने जीआर काढून मराठा समाजातील माजी सनदी अधिकाऱ्यांची वर्णी लावली आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या अगदी मर्जीतील माजी सनदी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अजित निंबाळकर यांची सारथीच्या अध्यक्ष आहेत. त्यासोबतच आता माजी अधिकारी मधुकर कोकाटे, उमाकांत दांगट आणि नवनाथ पासलकर हे सर्व निवृत्त अधिकारी यांचीही सारथीवर वर्णी लावण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी उपमुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील अधिकारी आहेत. तसेच पुणे विभागीय आयुक्त, कौशल्य विकास आयुक्त, शालेय शिक्षण आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास आयुक्त, क्रीडा व युवक कल्याण आयुक्त आदी पुण्यातील विद्यमान अधिकारी शासकीय संचालक म्हणून संस्थेवर नियुक्त केले आहेत. सारथीत आता एकुण 12 सदस्यांचे संचालक मंडळ असून त्यामध्ये चार अशासकीय सदस्य आहेत. विशेष म्हणजे ते सर्व निवृत्त सनदी अधिकारी आहेत.
हेही वाचा- 'मुंबईतील अखंडित वीजपुरवठ्यासाठी विक्रोळी 400 केव्ही उपकेंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण करा'
मराठा समाजातील तरुणांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने पुण्यात सारथी संस्था 2018 मध्ये स्थापन केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि आघाडी सरकार सत्ताधारी झाले. सारथी संस्था इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण विकास विभागाच्या अखत्यारीत होती. या विभागाचे मंत्री काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आहेत. वडेट्टीवार यांनी सारथी संस्थेच्या मनमानी कारभारावर चाप लावण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मराठा समाजातील अनेक नेत्यांकडून वडेट्टीवार हे ओबीसी असल्याने सारथीशी दुजाभाव करत आहेत, असे आरोप होत होते. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे आंदोलन आणि मागण्यांचा जोर वाढत असल्याने सारथी संस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाच्या अखत्यारित देण्यात आली होती.
हेही वाचा-चकमक करणाऱ्या दहशतवाद्याला शरण येण्याचे सैनिकाकडून आवाहन, नंतर असे घडले नाट्य...