मुंबई : कोरोना आणि त्यानंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून एमएचटी-सीईटी २०२० ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात आली. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल शनिवारी मध्यरात्री जाहीर करण्यात आला. सीईटीच्या या निकालामुळे राज्यात लवकरच अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुण्यातील दोघे ठरले टॉपर..
सीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेत पीसीबी गट आणि पीसीएम या गटामधून पुण्यातील अनुक्रमे अनिश जगदाळे आणि सानिका घुमास्ते राज्यात टॉपर ठरले आहेत. तर पीसीबीमधून तब्बल १९ आणि पीसीएममधून २२ विद्यार्थ्यांची पर्सेंटाइल १०० टक्के इतकी राहिली आहे.
सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा..
सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटी २०२० या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ३६ जिल्हांच्या ठिकाणी १८७ परीक्षा केंद्रावर आणि महाराष्ट्राबाहेरील १० अशा एकूण १९७ परीक्षाकेंद्रावर ऑनलाईन पध्दतीने १६ दिवसांत ३२ सत्रामध्ये घेण्यात आली होती. राज्यभरातून या परीक्षेला ५ लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर यातील १ लाख ५५ हजार ८२७ विद्यार्थ्यांनी म्हणजेच २८.७३ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली होती. त्यामुळे नोंदणी केलेल्या पैकी ७१.२७ टक्के म्हणजेच ३ लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामधे गट निहाय विद्यार्थ्यांमध्ये पीसीएम या विषयामध्ये १ लाख ७४ हजार ६७९ तर पीसीबी या विषयामध्ये २लाख ११ हजार ९२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
गुणवत्तेच्या आधारे मिळणार प्रवेश..
एमएचटी-सीईटी २०२० या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळणार आहेत. त्यासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया ही उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुरू केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरुन पाहता येणार असून त्यासोबत आपले स्कोरकार्ड डाऊनलोड करता येणार आहे.
पीसीएम या गटामधून अनुसूचित जाती, जमातीचा एकही टॉपर नाही..
पीसीएम या गटामधून २२ विद्यार्थ्याचे पर्सेंटाइल हे १०० टक्के इतके असून यात एकही विद्यार्थी हा अनुसूचित जाती, जमातीचा या यादीत येऊ शकला नाही. तर यात २२ पैकी १६ विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील आणि उर्वरित ओबीसी, एसईबीसी, व्हीजेएनटी आदी प्रवर्गातील आहेत. तर पीसीबी या गटातून नागपूर येथील अनुसूचित जाती या प्रवर्गातील स्मिथ वाळके हा विद्यार्थी टॉपर ठरला असला तरी या गटात अनुसूचित जमातीचा एकही विद्यार्थी या यादीत येऊ शकला नाही.
हेही वाचा : 'कोरोना लसीकरणासाठी भारताला प्राधान्य, लस निर्मितीबाबत पंतप्रधानांशी सखोल चर्चा'