मुंबई - महानगरपालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शैक्षणिक शुल्क माफीसह अनेक प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले. यासंबंधी आधिक माहिती निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने दिली आहे.
'या' आहेत मागण्या
मार्चपासून निवासी डॉक्टर कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत. मात्र त्याचवेळी या निवासी डॉक्टरांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी आज सह्याद्री अतिथी गृह येथे मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. कोरोना काळात पहिल्या दिवसापासून निवासी डॉक्टर जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत. या काळात या डॉक्टरांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मार्चपासून आजपर्यंत शैक्षणिक सत्र सुरूच झालेले नाही.
असे असताना निवासी डॉक्टरांकडून शैक्षणिक शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे हे शुल्क माफ करण्याची मागणी मार्डने केली. तर पालिका रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी येणाऱ्या निवासी डॉक्टरांना 1 लाख रुपये शुल्क आकारले जाते. सरकारी रुग्णालयात असे कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे पालिका रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे शुल्क रद्द करावे, अशी ही मागणी मार्डने केली. यासाठी फक्त एक अध्यादेश काढण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान अन्यही मागण्या यावेळी मार्डने आदित्य ठाकरे यांच्या समोर ठेवल्या.
लवकरच आयुक्त आणि महापौरांसोबत बैठक
आजच्या बैठकीत मार्डकडून जे विषय मांडण्यात आले ते सर्व पालिकेशी संबंधित आहेत. तर हे सर्व विषय निकाली काढण्याचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्याची माहिती मार्डच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यासाठी लवकरच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबरोबर एक बैठक घेऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे हे प्रलंबित विषय लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास मार्डकडून व्यक्त होत आहे.