मुंबई - जगभरात पसरलेला कोरोना विषाणू सतत आपले रूप बदलत आला आहे. या विषाणूच्या बदलत्या रूपाची माहिती आणि त्याचा प्रसार किती लोकांना झाला याची माहिती मिळावी यासाठी 'जिनोमिक सिक्वेंसिंग' चाचण्या केल्या जातात. मुंबई महापालिकेने या चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू केल्या आहेत. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १९६ सॅम्पल टेस्टिंग मशीनमध्ये ठेवण्यात आले असून दोन दिवसांत त्यांचा रिपोर्ट मिळणार आहे. यामुळे आता पुण्यावरून येणाऱ्या रिपोर्टची दोन महिन्यांची प्रतिक्षा संपली असून वेळीच निदान झाल्याने वेळवर उपचार करणे शक्य होणार आहे.
चाचण्या सुरू
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. गेल्या दीड वर्षात कोरोना, म्यूकरमाकोसिस, डेल्टा आणि डेल्टा प्लससारखे स्ट्रेन समोर आले आहेत. अशा बदललेल्या स्ट्रेनच्या विषाणूची चाचणी करण्यासाठी मुंबईत सुविधा नसल्याने हे नमुने पुण्याला एनआयव्ही प्रयोग शाळेकडे पाठवावे लागत होते. या चाचण्यांचा अहवाल येण्यास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागत असल्याने आजार पसरण्याचे प्रमाण वाढत होते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात अमेरिकेतून अत्याधुनिक 'जिनोमिक सिक्वेंसिंग' चाचण्यांचे मशीन आणले गेले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जिनोम सिक्वेंसिंग लॅबचे लोकार्पण करण्यात आले. कोरोना नियंत्रणात आल्यामुळे या चाचण्यांसाठी आवश्यक सॅम्पल मिळत नसल्याने चाचण्या होत नव्हत्या. मात्र आता पुरेशी सॅम्पल जमा झाल्याने टेस्टिंग सुरू करण्यात आले आहे.
१९६ सॅम्पलची चाचणी
जिनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये पहिल्या टप्प्यात १९६ सॅम्पलची चाचणी होणार आहे. याचा रिपोर्ट आल्यानंतर सोमवारी या विषाणूचा स्ट्रेन कोणता हे समजेल. यानंतर पुढच्या टप्प्यात एकावेळी ३८४ सॅम्पलची चाचणी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कस्तुरबा रुग्णालयातील लॅबच्या प्रमुख असलेल्या डॉ. जयंती शास्त्री यांनी दिली आहे.
जिनोम सिक्वेसिंग लॅब
नेक्स्ट जनरेशन जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती वापरून विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखता येते. त्यामुळे एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. जिनोम सिक्वेसिंग वैद्यकीय प्रयोगशाळा (लॅब) मध्ये एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते. सध्याच्या कोविड – १९ विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य होणार आहे.
हेही वाचा - देशाला मिळाली दुसरी स्वदेशी कोरोना लस; झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन मंजुरी