मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल रात्री ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे, अजित पवार, राजेश टोपे आणि रोहित पवार हेदेखील रुग्णालयात उपस्थित होते. शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट करून सांगण्यात आलंय.
शस्त्रक्रियेनंतर पवार आपल्या आवडत्या कामात मग्न..
पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून; आज (बुधवार) सकाळी ते आपल्या आवडत्या कामात म्हणजेच वर्तमानपत्रं वाचण्यात मग्न होते. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट..
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्यावर काल झालेल्या शस्त्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी त्यांची फोन वरून किंवा समक्ष भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे. खासदार नारायण राणे त्यांच्या पत्नी आणि नितेश राणे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तर, भेट घेऊन आल्यानंतर शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून अजून एक शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांच्यावर होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
दोन दिवसांनी पुन्हा एक शस्त्रक्रिया..
पवारांच्या गाॅल ब्लॉडरमधील स्टोन काढण्याची शस्रक्रिया काल पार पडली. शरद पवारांवर लॅप्रोस्कोपी ही शस्त्रक्रिया पार पडली असून, अर्धा तास ही शस्त्रक्रिया चालली. या शास्त्रक्रियेनंतर शरद पवारांची तब्येत आत्ता स्थिर आहे, मात्र पोटाला सूज आल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. तसेच गॉल ब्लॅडरची आणखी एक शस्रक्रिया दोन ते तीन दिवसांनी पार पडेल अशी माहितीही रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा : शरद पवार अमित शाह गुप्त भेट; शिवसेनेने उलगडले भेटीमागचे सत्य