मुंबई - देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गडचिरोलीला सर्वाधिक १० वेळा भेट देणारे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. राज्य सरकारने गडचिरोली बाबत अनास्था दाखवल्यानेच नक्षली हल्ला झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. या टीकेला भाजपने हे उत्तर दिले आहे. यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये भाजपने शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
असे आहे भाजपचे ट्विट -
परवा आपण म्हणालात, मुख्यमंत्री केवळ शहिदांना अभिवादन करण्यासाठी गडचिरोलीला जातात. खरं तर दुष्काळ, नक्षली हल्ले यांसारख्या संवेदनशील प्रश्नांवर राजकारण पाहिल्यावर ‘जनाची नाही तर मनाची’ असे आम्हालाही म्हणावे वाटते. पण, आम्ही तसे म्हणणार नाही!
गडचिरोलीला सर्वाधिक दहा वेळा भेट देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. ते दहा वेळा तेथे कशासाठी गेले, याचा आलेख आपल्या माहितीसाठी देत आहे. आता आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण किती वेळा, कशासाठी गडचिरोलीत गेलात, याचीही माहिती कृपया महाराष्ट्राला द्याल का ?
आपण म्हणालात मी दुष्काळी भागात दौरा केला, म्हणून सरकार जागे झाले. मग आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 कोटींवर रक्कम जमा झालेली, गावांत टँकर, चारा छावण्या, हे सारे काही उगाच झाले की काय?
राजकारणाच्या पलिकडे जाऊन कधीतरी, अशा प्रश्नांचा विचार करणे आवश्यक असते आणि तो आम्ही करतो. काही प्रश्न राजकारणाच्या पलिकडे असतात. ही संवेदनशीलता आपण दाखवाल, याची अपेक्षा करण्यापलिकडे महाराष्ट्राच्या हाती आहे तरी काय?
दरम्यान पवार यांनी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा दाखल देत सरकारवर टीका करताना म्हटले की, आर. आर. पाटील दर दोन महिन्यातून एकदा गडचिरालीत जाऊन तिथल्या विकास कामांचा आढाव घेत होते. मात्र आताच्या गृहमंत्र्यांनी अनास्था दाखवल्यानेच नक्षली हल्ला झाला.