मुंबई - भारतीय रेल्वेने रेल्वे परिसरात आणि रेल्वे प्रवासात मास्क घालणे बंधनकारक केले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागात 17 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत मास्क न घातलेल्या 446 प्रवाशांकडून 77 हजार दंड वसूल केला आहे.
विना मास्क प्रवाशांवर कारवाई-
रेल्वे परिसरात किंवा रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळून आल्यास अथवा कुठेही थुंकण्यामुळे रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरेल. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. कोरोना काळात अस्वच्छता पसरविल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे भारतीय रेल्वेने 17 एप्रिल रोजीपासून कडक नियमावली जाहिर करून अंमलबजावणीस सुरूवात केली. रेल्वे परिसर अथवा रेल्वेत असताना विनामास्क सापडल्यास 500 रुपयांचा दंड ठोठविण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानक परिसर अथवा रेल्वेत थुंकून परिसर अस्वच्छ केल्यासही 500 रुपये दंड भरावा लागत आहे. यातून मध्य रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी विना मास्क घातलेल्या प्रवाशांकडून दंड वसूली केली आहे.
1 कोटी 20 लाख रुपयांची दंड वसूल-
एप्रिल 2021मध्ये, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरीय लोकलमधून नियमित तिकीट तपासणी करून तिकीट नसणाऱ्या वा अवैध तिकीट असणाऱ्या 42 हजार 858 व्यक्तीकडून दंड करून 1 कोटी 20 लाख रुपयांची दंड वसूली केली आहे.
राज्य सरकारच्या 'ब्रेक द चेन' अंतर्गतच्या नियमावलीनुसार परवानगी असलेल्या प्रवाशांना केवळ लोकलमध्ये प्रवास करण्यास परवानगी देण्यात येत आहे. यासह इतर प्रवाशांना स्थानक परिसरात किंवा लोकलमध्ये चढू दिले जात नाही. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.