मुंबई : मुंबई वाहतूक पोलीस वाहन चालकांकडून टोईंग चार्जेसच्या नावाखाली बेकायदेशीर ( Mumbai Traffic Police Ransom ) खंडणी वसूल करतात. त्याविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ( Petition Filed Against Police High Court ) दाखल करण्यात आली आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही या याचिकेतून केली आहे.
सुनिल टोके यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यावर आज शुक्रवारी ( दि. 07) रोजी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. याचिकेत म्हटल्यानूसार, टोईंग चार्जेसच्या नावाखाली अवजड ट्रक चालकांकडून वाहतूक पोलीस खंडणी वसूल करतात. नारपोली माणकोली, कळवा, खारेगाव, मुंब्रा टोलनाका, कल्याण फाटा, कापूरबावडी माजिवडा, पनवेल, महापे, कळंबोली आणि तळोजा या परिसरात हे प्रकार घडतात. राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आदी राज्यांतून येणाऱ्या ट्रक चालकांकडून हे पैसे संरक्षण शुल्काच्या नावाखाली घेतले जातात, असे या याचिकेत सांगितले आहे.
कोण आहे सुनील टोके?
सुनील टोके हे मुंबई पोलीस वाहतूक विभागात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. टोके यांनी यापुर्वीही वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराविरोधात वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी दखल न घेतल्याने टोके यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्या याचिकेत त्यांनी वाहतूक विभागाच्या भ्रष्टाचाराचे रेटकार्डचं कोर्टासमोर सादर केले होते. याची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सखोल चौकशीचे आदेश दिले होते.