मुंबई - मुंबईतील फिल्म सिटी मुंबईतून काही हलणार नाही. सर्व कलाकार तिथे जाणार नाहीत. मुंबई दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी नवीन फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केल्यानंतर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ई-रिक्षाचे अनावरण केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत नाहीत.
उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचे योगी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. यानंतर बॉलीवुड उत्तर प्रदेशला जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, की बॉलिवूड मुंबईतून काही हलणार नाही. पूर्ण फिल्म सिटी उत्तर प्रदेशात नेण्याचा योगी यांचा मानस नाही.
हेही वाचा-आम्ही नवीन फिल्म सिटी उभारणार, शिवसेना चिंतेत का? - योगी आदित्यनाथ
बेरोजगारांना कमी किमतीत मिळणार ई-रिक्षा
कोरोना महामारीत अनेकांचे तरुणांचे रोजगार गेले आहेत. दिल्लीच्या ई- रिक्षाच्या धर्तीवर राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला आहे. गेस्ट हाऊस येथे ई-रिक्षाचे अनावरण आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. या रिक्षा कमी दरात तरुणांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हेही वाचा-'योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादसह चेन्नईमधील फिल्मसिटीतही जाऊन त्यांना बोलवावे'
फिल्म सिटीवरून योगी आदित्यनाथ व संजय राऊत यांच्यात वाक्युद्ध-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये नवीन फिल्म सिटी उभारणार असल्याचे जाहीर केले. त्यावर संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांनी चेन्नईसह हैदराबादमधील फिल्म सिटीत जावे, असा टोमणावजा सल्ला दिला आहे.