मुंबई- तौक्ते या चक्रीवादळात सापडलेल्या अरबी समुद्रातील पी 305 बार्ज वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न भारतीय नौदलाकडून करण्यात येत आहेत. आतापर्यंत 188 कर्मचाऱ्यांना पी 305 वरून सुखरूप रित्या वाचण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत 61 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत. मात्र या 61 जणांपैकी केवळ 30 कर्मचाऱ्यांची ओळख पटली असून उर्वरित कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे बार्ज पी ३०५ चे कॅप्टन राकेश बल्लव यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
पी 305 चा कॅप्टन अजूनही बेपत्ता-
पी 305 बार्ज वर काम करणाऱ्या मुस्तफिजुर रहमान शेख यांच्या तक्रारीवरुन बार्जचा कॅप्टने राकेश बल्लव याच्या विरोधात यलोगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. मात्र तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी 305 चा कॅप्टन राकेश बल्लव हा अद्यापही नौदलाच्या बचाव व शोध मोहीम कामादरम्यान आढळून आलेला नाही. सध्या तो बेपत्ता आहे. पी 305 बार्ज वर काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी आरोप केलेला आहे की चक्रीवादळ येणार असल्याची माहिती नौदलकडून देण्यात आल्यानंतरही बार्जचा कॅप्टन राकेश बल्लव याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.
समुद्रात मारली उडी-
ज्या वेळेस चक्रीवादळाच्या तडाख्यात बार्ज पी 305 सापडली होती, त्यावेळेस नौदलाचे जहाज कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी आले होते. त्यावेळी सर्वात अगोदर बार्जचा कॅप्टन राकेश बल्लव यानेच समुद्रात उडी मारली होती. मात्र त्यास वाचवण्याचा प्रयत्न केला जात असताना राकेश बल्लव हा समुद्रात बुडाला असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.
दरम्यान , या घडलेल्या दुर्घटनेसाठी येलोगेट पोलीस स्टेशनमध्ये एडीआर ची नोंद करण्यात आलेली असून पी 305 बार्ज चा कॅप्टन राकेश बल्लव याच्याविरोधात 30(2) 338 नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. नौदलाकडून अजूनही अरबी समुद्रातील पी 305 च्या परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आलेली असून अद्यापही 20 हुन अधिक कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही, ज्यामध्ये पी 305 बार्ज च्या कॅप्टन राकेश बल्लव यांचाही समावेश आहे.