मुंबई - राज्याची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उपक्रमशीलता वाढवणे, उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान समुहांना सन्मानित करून समाजात त्यांची ओळख निर्माण करणे, समाजात माहिती तंत्रज्ञानाचा गतिमान वापर होण्यासाठी प्रोत्साहन देणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्यावर भर देणे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणाचे जतन व संवर्धन करणे अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज (शुक्रवार) दिली.
'या' पाच विभागातून निवड -
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी इंजिनियरींग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इंफ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसिंग स्टार्ट-अप आणि स्पेशल अवार्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टु महाराष्ट्र अशा ५ विभागात या पुरस्कारांची निवड होणार असल्याची माहिती राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. पुरस्कार, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप जाणार आहे.
'असे' आहे पुरस्कारांचे वेळापत्रक -
- २० ऑगस्ट, २०२१ रोजी नामांकनासाठी अर्ज दाखल करण्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे.
- १५ सप्टेंबर, २०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल.
- २७ सप्टेंबर, २०२१ रोजी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येईल.
- ३० सप्टेंबर, २०२१ रोजी छाननी समितीची प्राथमिक बैठक होईल
- तर २० ऑक्टोबर, २०२१ छाननी समितीची अंतिम बैठक होईल.
- ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
केंद्राने बदलले होते खेलरत्न पुरस्काराचे नाव -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारा'चे नाव बदलून 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' असे घोषित केले होते. त्यानंतर राज्य सरकारने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार राज्य सरकारकडून राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.