मुंबई - भाजपने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये, अशी अपेक्षा मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यायला हवे. पत्नी आमदार झाल्यास रमेश लटके यांच्या आत्म्यास शांती मिळेल, असे राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.
सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीवर लागले आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, भारतीय जनता पक्षाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. दिवंगत आमदार रमेश लटके हे आपल्या सर्वांचे सहकारी होते. त्यामुळे सहानुभूतीचा विचार करून भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार या निवडणुकीत देऊ नये अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
ही महाराष्ट्राची महान संस्कृती -दिवंगत आमदार रमेश लटके हे एक चांगले कार्यकर्ते होते. शाखाप्रमुख पदापासून शिवसेनेत त्यांनी आपली वाटचाल सुरू केली. ते आमदार पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या राजकीय प्रवासाचे आपण स्वतः साक्षीदार आहोत. त्यामुळे त्यांच्या पत्नी आमदार झाल्यास त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल. अशा परिस्थितीत आपण आपल्या पक्षाकडून निवडणूक न लढवण्याची भूमिका घेत असतो. असं केल्यास दिवंगत लोकप्रतिनिधीच्या आत्म्याला आपल्याकडून श्रद्धांजली वाहिली जाते अशी आपली भावना आहे. आपणही तसं करावं. ही महाराष्ट्राची महान संस्कृती आहे असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.
नुकतेच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरे भाजपला पाठिंबा देऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.