मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे याबाबत आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना पुन्हा एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा ट्विटद्वारे वापर केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे वारंवार बाळासाहेबांचा वापर का करतात? याबाबत जाणकारांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत...
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यांबाबत आपली भूमिका ठाम असल्याचे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे यांबाबत भाषणात केलेल्या विधानाचे ट्विट केले. ट्विट द्वारे त्यांनी बाळासाहेबांच्या भाषणातील चित्रफित प्रसारित केली. आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालत असून महा विकास आघाडी सरकारने विशेषता शिवसेनेने बाबासाहेबांच्या विचारांवर चालायचे की शरद पवार यांच्या विचारांवर चालायचे असे हे ठरवावे, अशी मार्मिक टिप्पणीही राज यांनी केली आहे. मात्र राज्यांना वारंवार का बाळासाहेबांच्या विचारांचा आणि त्यांच्या भाषणांचा आधार घ्यावा लागतो याबाबत आम्ही जाणकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
राज यांच्याकडे बाळासाहेबांशिवाय भांडवल नाही - राज ठाकरे हे वारंवार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील दाखले किंवा त्यांची मते मांडण्याचा प्रयत्न करतात. याचे कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय राज ठाकरे यांना पर्याय नाही त्यांच्याकडे दुसरे कुठलेही भांडवल नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जनमानसामध्ये असलेल्या प्रतिमेचा वापर करून आपल्यालाही जनतेचा प्रतिसाद मिळेल असे राज ठाकरे यांना वाटत आहे तसेच शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करीत आहेत मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. शरद पवार हे जातीयवादी आहेत असं म्हणणं हे अजिबात योग्य नाही शरद पवार यांच्यासारखे धर्मनिरपेक्ष नेतृत्व नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव दत्ताजिराव देसाई यांनी व्यक्त केली आहे.
राज ठाकरे यांचे बाळासाहेंबांविषयी बेगडी प्रेम - राज ठाकरे यांचं बाळासाहेब प्रेम हे केवळ दाखवण्यापुरतं आहे. जर बाळासाहेबांचा एवढाच राज साहेबांना पुळका असता तर त्यांनी त्यांचे वडे काढले नसते, त्यांचे जेवण काढलं नसतं. मातोश्रीला सातत्त्याने अडचणीत आणलं असतं आणि मुख्य म्हणजे शिवसेना भवनावर दगडफेक करवली नसती. त्यामुळेच केवळ मराठी माणसांच्या मनात असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा प्रयत्न राज करतात. आपण बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहोत हे दाखवण्याचा राज यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यात ते यशस्वी होणार नाहीत अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली आहे.
थोर पुरुषांच्या प्रतिमा ही कुणाची मक्तेदारी नाही - कोणताही राजकीय पक्ष काही विचारांनी चालत असतो एखाद्या थोर पुरुषांची विचार झाला पक्षाने अंगिकारलेली असते. राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा अंगीकारली असेल तर त्यांनी बाळासाहेबांचे दाखले देणे, अथवा त्यांच्या भाषणांचा वापर करणे हे अयोग्य वाटत नाही. बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनेची मक्तेदारी नाही त्यांच्या भाषणाचा अथवा विचारांचा वापर अन्य पक्ष सुद्धा करू शकतात त्यामुळे राज ठाकरे यांनी वारंवार बाळासाहेबांच्या विचारांचे दाखले देणे गैर नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक चंदन शिरवाळे यांनी व्यक्त केली आहे.