मुंबई - जेष्ठ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांना चित्रपट सृष्टितील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. या बद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रजनीकांत यांचे अभिनंदन केले आहे.
रजनीकांतना काहीच अशक्य नाही, असे त्यांच्या चाहत्यांना वाटणे योग्यच, पण अशा आशयाचे हलकेफुलके विनोद त्यांचे सिनेमे फारसे न पाहिलेला पण हिरहिरीने एकमेकांना पाठवतो. ज्या अभिनेत्याचे देऊळ उभारले जाऊन, रजनीकांत या व्यक्तीला जवळपास देवाच्या जवळ नेऊन त्यांचा एक पंथ निर्माण होतो, आणि इतकं असताना हाच अभिनेता अपूर्व प्रसिद्धीच्या झोतात देखील सिनेमातील पात्राची झूल उतरवून सामान्य माणसासारखा जगू शकतो असा हा एकमेवाद्वितीय सुपरस्टार. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. कर्मभूमीचे ऋण अपार मानणाऱ्या या अभिनेत्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनापासून अभिनंदन, अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.
रजनीकांत यांचा प्रवास -
रजनीकांत यांना ‘बिल्ला’ या सिनेमाने खरी ओळख दिली आहे. याच सिनेमवरुन नंतर बॉलिवूडमध्ये ‘डॉन’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. आजवर त्यांनी तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमधून सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. रजनीकांत यांची प्रत्येक भूमिका ही वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळते.
रजनीकांत यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची स्टाईल ही त्यांची ओळख आहे. बिनधास्त, धडाकेबाज तसचे कधी रोमॅण्टिक तर कधी विनोदी अशा सर्व प्रकारच्या अभिनयातून त्यांनी दाक्षिण्यात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही त्यांची ओळख निर्माण केली.