मुंबई - मुंबईत शनिवार रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे विक्रोळी आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकदारम्यान पावसाचे पाणी साचले होते. यामुळे सुमारे वीस मिनिटे लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. सध्या लोकलसेवा सुरू असून ती उशिराने धावत आहे.
लोकल सेवा संथ गतीने
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार बॅंटिग केल्याने रेल्वे सेवा कोलमडून पडली आहे. संपूर्ण दिवस लोकलचा चालू-बंद खेळ सुरू होता. त्यामुळे सकाळी बाहेर पडलेल्या नागरिकांना घरी जाण्याची ओढ लागली होती. आज सोमवारी, (ता. 19) रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विक्रोळी-कांजूरमार्ग लोकल सेवा बंद केल्या होत्या. त्यानंतर 15-20 मिनिटांनी विक्रोळी-कांजूरमार्ग लोकल सेवा सुरू करण्यात आली. तर, इतर मार्ग संथ गतीने सुरू होते. लोकल चालू-बंदचा खेळ सुरू असल्याने सीएसएमटी येथे लोकल बँचिग झाली होती. मध्य व हार्बर दोन्ही मार्गावर लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिरा धावत आहे.
जोरदार पावसाची हजेरी
आज सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 4 तासात शहर 6.29 मिलिमीटर, पूर्व उपनगर 40.57 मिलिमीटर तर, पश्चिम उपनगर 24.44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, रविवार सकाळी 8 ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात शहर 48. 88, पश्चिम उपनगर 51. 89, पूर्व उपनगर 90. 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत थंड वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रेल्वे गाड्या कोकण मार्गाने वळवल्या
कोकण मार्गावर थिविम आणि करमाली दरम्यान डोंगरावरील माती वाहून आल्याने रेल्वेमार्गावर चिखल झाला आहे. रेल्वेमार्गावरील चिखल बाजूला करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या गाड्या पनवेल, कर्जत, पुणे, मिरज, हुबळी, कृष्णराजापुरम, एरोडे, शोरनुर या मार्गे वळवण्यात आल्या आहेत.