मुंबई - कामगार रंगभूमीचं हक्काचं व्यासपीठ असणारे परळचे दामोदर हॉल नाट्यगृह पूर्णपणे जलमय झालं आहे. आज दिवसभर मुंबईत कोसळत असलेल्या पावसाचा फटका परळ लालबाग या भागाला बसला आहे. त्यात या नाट्यगृहाचे अपरिमित नुकसान झालेलं आहे.
मुंबई महापालिकेच्या जागेत आणि ना. म. जोशी विद्या संकुल यांच्या ताब्यात असलेल्या या नाट्यगृहातील खुर्च्या, स्टेज समोरची पिटातली जागा ही पुरती पाण्याने वेढली गेली आहे. त्यामुळे आधीच कमी नाट्यप्रयोग होत असलेल्या या नाट्यगृहाला पुन्हा सुरू व्हायला आता वेळ लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षात लावण्यांचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, काही पक्ष आणि संघटनांच्या वार्षिक सभा आणि काही छोट्या नाटकांचे प्रयोग या नाट्यगृहात होत होते. त्यामुळे काहीसं वाळीत पडल्यासारखीच परिस्थिती होती. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सूरु झाल्यापासून इतर नाट्यगृहाप्रमाणे हे नाट्यगृह देखील गेले सहा महिन्यांपासून बंदच ठेवण्यात आलं होतं.
आज पावसाने ते पुरतं खराब झाल्यामुळे त्याला कुलूप लावून ते बंद करुन ठेवण्यात आलं आहे. मात्र ते पुन्हा पूर्ववत सूरु करणं संस्थेला परवडणारे नसले तरी या नाट्यगृहाला कायमचं टाळं लागू नये, एवढीच अपेक्षा रंगकर्मी करत आहेत.