मुंबई- मध्य रेल्वेच्या ऑलिम्पिक हॉकीपटू मोनिका मलिक आणि वंदना कटारिया यांना टोकियो, जपान येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मोनिका आणि वंदना यांना १३ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मोनिका मलिक या मुंबई विभागात मध्य रेल्वे मुख्य तिकीट तपासणीस आहेत. सध्या विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून पदोन्नतीने कार्यरत आहेत. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय हॉकी संघाने सेमी-फायनलमध्ये स्थान निश्चित केले होते. याशिवाय मोनिकाने रिओ ऑलिम्पिक २०१६ नंतर तिची सलग दुसरी ऑलिम्पिक खेळी केली. त्यांनी प्रामाणिकपणाने आणि कठोर परिश्रमाने अलीकडील ऑलिम्पिकमध्ये नावलौकिक मिळवून भारताचा आणि मध्य रेल्वेचा अभिमान वाढविला आहे.
हेही वाचा-हृदयद्रावक : भाऊबीजेच्या पूर्वीच बहिण भावावर काळाचा घाला; जात होते मामाच्या गावी
हॉकीमध्ये हॅट्ट्रिक करणारी एकमेव महिला-
वंदना कटारियाही मध्य रेल्वेचा मुंबई विभागात मुख्य तिकीट तपासणीस असून सध्या विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून पदोन्नतीने काम करत आहेत. त्या भारतीय महिला हॉकी संघाचा भाग होत्या. कोणत्याही ऑलिम्पिक खेळांमध्ये फील्ड हॉकीमध्ये हॅट्ट्रिक करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. वंदनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी अतिशय जलद हॅट्ट्रिक केली. भारताला उपांत्य फेरीत नेण्यात चपळ खेळाडू म्हणून त्यांचे योगदान मोलाचे होते.
हेही वाचा-आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा भ्रमाचा भोपळाही फुटणार - शिवसेना
रेल्वेकडून राजपत्रित अधिकारी म्हणून पदोन्नती
मध्य रेल्वेच्या सुशीला चानू, वंदना कटारिया, मोनिका मलिक आणि रजनी एतिमार्पू या चार महिला हॉकीपटूंनी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या चारही हॉकीपटूंनी पूर्वी मुख्य तिकीट तपासणीस म्हणून काम केले होते. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला प्रथमच उपांत्य फेरीत नेण्यात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत मध्य रेल्वेने त्यांना राजपत्रित अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे.
हेही वाचा-कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अजित पवार पाडवा कार्यक्रमाला अनुपस्थितीत; शरद पवारांनी दिले उत्तर
रेल्वेकडून खेळाडूंना प्रोत्साहन-
टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकीचे प्रतिनिधित्व केले आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील या चारही महिला हॉकीपटूंची भारताला उपांत्य फेरीत नेण्यासाठी मोठे योगदान आहे. मध्य रेल्वे नेहमीच आपल्या खेळाडूंना उच्च दर्जा स्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करते. त्यांना प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देते असल्याची प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली.