मुंबई - कधी सोसाट्याचा वारा, कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी, तर कधी अंग भाजून काढणारे रणरणते ऊन असते. त्यात जंगली श्वापदांचा वावर, सतत पाण्याचा दुष्काळ अशा बिकट परिस्थितीत मराठमोळे रेल्वेचे हिल गँगचे रेल्वे कामगार घाट मार्गावर पावसळ्यात रेल्वे गाड्या सुरक्षित धावाव्यात यासाठी कोरोनासारख्या अत्यंत आव्हानात्मक काळात हे कामगार काम करीत आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..
अहोरात्र परिश्रम
पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई मार्गावर लोणावळा ते कर्जत या घाटमार्गावर रेल्वेला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात लोणावळा ते कर्जत या मध्य रेल्वेच्या हद्दीत अनेकदा दरड कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र, पावसाळ्यात या घटना घडू नयेत, याकरिता पावसाळ्यापुर्वी मध्य रेल्वेकडून तयारी केली जाते. उंच डोंगरावर यावर लक्ष ठेवण्यासाठी या हिल गँगची महत्वपूर्ण भूमिका असते. हिल गँगमधील रेल्वे कर्मचारी जीवाची पर्वा न करता या आव्हानात्मक काळात घाटातील मान्सूनपूर्व काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.
काय आहे हिल गॅंग?
लोणावळा आणि कर्जत घाट विभागात उंचच उंच डोंगरावर हिल गँग काम करते. सध्या मध्य रेल्वेवर दोन हिल गँग आहेत. प्रत्येक गँगमध्ये 15 माणसे आहेत. या दोन हिल गँगमध्ये फक्त दहा-दहा कर्मचारी आहेत. एक हिल गँग लोणावळा घाट विभागात तर दुसरी कर्जत घाट विभागात कार्यरत आहे. या हिल गँगची उभारणी इंग्रजांनी स्थानिक लोकांमधून केली होती. कारण सह्याद्री पर्वतरांगांमधील या दुर्गम भागाची, या ओबडधोबड डोंगरांची, जीवघेण्या चढउतारांची सखोल माहिती येथील लोकांना असते. त्यामुळे इंग्रज राजवटीपासून हिल गँगसाठी याच परिसरातील लोकांची भरती केली जाते. पावसाळ्यापूर्वी हिल गँगचे कामगार दोरीच्या सहाय्याने उंच डोंगरावर चढतात. ढिसूळ झालेली दरड शोधून त्या पाडण्याचे काम या हिल गॅंग करत आहे.
हिल गँगच्या कामाची पद्धत
रेल्वेच्या घाट विभागात पावसाळ्यात दरड कोसळण्याचा घटना घडत असतात. त्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. डोंगरावरची दरड कोसळून ती रेल्वेवर किंवा रेल्वे रूळावर पडू नये, यावर लक्ष ठेवण्यासाठी या हिल गँगची महत्वपूर्व भूमिका असते. हिल गँगचे सदस्य दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत रुळांशेजारील उंच आणि उभ्या डोंगरांवर चढतात आणि रॅपेलिंगद्वारे सैल आणि असुरक्षित दरडी शोधून काढतात आणि लाल रंगाने ते चिन्हांकित करतात. त्यानंतर, एप्रिल आणि मे महिन्यात ते दररोज ४ ते ५ तासांचा ब्लॉक घेवून असे चिन्हांकित सैल आणि असुरक्षित दरड मेगाब्लॉक घेऊन मोठ्या कौशल्याने पाडतात.
सुरक्षेची काळजी
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा आणि कर्जत घाटात हिल गँगचे हे काम महत्वाकांक्षी आणि धाडसी आहे. कामगारांची पूर्ण काळजी घेण्यासाठी रेल्वेकडून सुरक्षा साहित्य दिले जाते. ज्यामध्ये सुरक्षा गीअर्स आणि उपकरणे म्हणजे सेफ्टी हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट (हार्नेस), दुर्बिणी, १०० मीटर दोरी, हँडग्लोव्हज, सेफ्टी जॅकेट, कटवनी, पहार, फोंक, रेड पेंट, ब्रश, प्रथमोपचार बॉक्स, ५ किलो घन, वेगवेगळ्या आकाराचे हातोडे, शिटी, छन्नी, वेगवेगळ्या आकाराच्या कुऱ्हाडी, वायरचा पंजा, हँड सिग्नलचा लाल / हिरवा झेंडा, फावडे, जाम बावटा व घमेला या वस्तूंचा समावेश आहे.
हिल गँगमध्ये मराठी कनेक्शन
हिल गँग कामगार निलेश मरोड यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, माझे वडील राजू मरोड हे हिल गँगमध्ये होते. ते निवृत्त झाल्यानंतर मी या हिल गँगमध्ये कार्यरत झालो. हे काम करत असताना सुरुवातीला मनात भीती होती, मात्र आता डोंगरावर चढण्याची सवय झाल्यामुळे भीती निघून गेली. मात्र हिल गँगमध्ये काम करत असताना सदैव तत्पर आणि सतर्क राहावे लागते. थोडीशी चूक झाली तर जीव गमावण्याची भीती असते. त्यामुळे आम्ही सर्व सतर्क असतो.
ऑन ड्युटी २४ तास
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, हिल गँग ही खंडाळा आणि कसारा घाटामध्ये कार्यरत असून, ट्रेन सुरळितपणे घाटातून चालाव्यात यासाठी, सैल दगड गोटे यांना ओळखून ते कौशल्याने त्यांना हटवतात. पावसाळ्यापूर्वीची घाटातील कामे व्यवस्थित वेळेवर पार पाडण्यासाठी ही गँग महत्वाची असून 24 तास डोळ्यात तेल घालून काम करत असल्याने घाटातील रेल्वे वाहतूक चालविणे सोयीचे होत आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारची 250 कोटींची मदत