मुंबई - काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आजच्या काँग्रेसचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांना दिल्लीतील त्यांच्या तुघलक लेन या निवासस्थानी भेटलो. गांधी यांच्या नेतृत्वाविषयी आज सगळ्यात जास्त भ्रम आणि संशय निर्माण केला जात आहे. देशातील विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली एकवटायला तयार नाही. ( Uttar Pradesh, Punjab elections 2021 ) त्यामुळे मोदी व त्यांच्या पक्षाला रान मोकळे आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. ते तितकेसे खरे नाही. ममता बॅनर्जी यांनी 'यूपीए'च्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. विरोधी पक्षांच्या आघाडीचा नवा घोडा घेऊन प. बंगालच्या मुख्यमंत्री 2024 मध्ये मैदानात उतरत आहेत. त्यांना काँग्रेसशिवाय नवी आघाडी हवी आहे.
आजी आणि पिता अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले त्या कन्येस घर दिले नाही
मंगळवारच्या भेटीत राहुल गांधी यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. ''ममता बॅनर्जींच्या मनात नेमके काय आहे? त्यांना काय हवे आहे?'' हा प्रश्न त्यांच्याही मनात होताच. गांधी यांना मंगळवारी तर सध्या उत्तर प्रदेशात जागोजागी मोठी गर्दी जमत असलेल्या त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांना बुधवारी 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी भेटलो. ( Read Raut's 'Rokhathok' discussion samana ) ''तुम्ही सध्या इथेच राहता?'' यावर प्रियंका म्हणाल्या, ''सध्याच्या मोदी सरकारने मला घरातून बाहेर काढल्यापासून मी खान मार्केटजवळच्या एका इमारतीत राहते, पण लोकांना तेथे भेटता येत नाही. त्यामुळे येथे येऊन भेटीगाठी घेते.'' इंदिरा गांधींची नात, पंडित नेहरूंची पणती, राजीव गांधींची कन्या मला हे सर्व सांगत होती. ( Rahul Gandhi On Sanjay Raut ) तेव्हा राज्यकर्त्यांच्या मानसिकतेची दया आली. जिची आजी आणि पिता अतिरेक्यांच्या हल्ल्यात मारले गेले त्या कन्येस सुरक्षेच्या कारणास्तव एक सरकारी घर भाजप सरकार देऊ शकले नाही. उलट राहत्या घरातून बाहेर काढले. आज दिल्लीत अनेक सरकारी घरे 'गेस्ट अकॉमोडेशन'च्या नावाखाली कोणी व कोणत्या संघटनांच्या लोकांनी बळकावली आहेत हे पाहिल्यावर प्रियंका गांधींची वेदना लक्षात येईल.
सर्वत्र भय!
सर्वत्र एक प्रकारची भीती सध्या निर्माण करण्यात येत आहे. ही भीती ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांची आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये या यंत्रणा भाजपसाठी काम करतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना चौकशीच्या फेऱ्यात गुंतवून ठेवले जाते. भाजपविरोधात जे बोलतील ते शत्रू अशा पद्धतीचे वर्तन चालले आहे. यावर प्रियंका गांधी जे म्हणाल्या ते महत्त्वाचे. ''महाराष्ट्र, बंगाल काय घेऊन बसलात? मी व माझे कुटुंबही त्याच चक्रातून जात आहोत. मी लखीमपूर खिरीला जाताच माझ्या पतीला एका दिवसात 69 नोटिसा आल्या इन्कम टॅक्सच्या, पण मी मागे हटणार नाही. लढत राहीन.'' प्रियंका यांच्या वागण्या-बोलण्यात सकारात्मक आक्रमकता व इंदिरा गांधींचे तेज आहे. ''लोक म्हणतात मी इंदिराजींसारखी थोडी रागीट आहे, पण अन्यायाविरुद्ध थोडा संताप हा हवाच!'' असे प्रियंका म्हणाल्या.
प्रियंका शांतपणे त्यावर म्हणाल्या, ''मी पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करतेय
''इंदिराजींचे व्यक्तिमत्त्व विलोभनीय होते. त्यांच्याविषयी कमालीचा आदर व प्रेम लोकांत होते. आणीबाणीनंतर लोक त्यांच्यावर रागावले, पण त्याच लोकांनी दोन वर्षांनी पुन्हा इंदिराजींना निवडून दिले. प्रेमाचा वर्षाव केला. तुम्हालासुद्धा उत्तर प्रदेशात आता तेच प्रेम मिळताना आम्ही पाहतोय,'' असे मी म्हणालो. प्रियंका शांतपणे त्यावर म्हणाल्या, ''मी पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करतेय. आव्हान आहे. जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. तरीही मी तेथे ठामपणे उभी आहे!'' प्रियंका व राहुल गांधी यांच्यात कमालीची एकवाक्यता आहे. राजकीय चर्चेत प्रियंकांकडून एखाद्या भूमिकेची लगेच अपेक्षा करावी तर ही छोटी प्रियदर्शनी शांतपणे सांगते, ''इस पर भैया से बात करनी पडेगी. भैया को पूंछना होगा.'' दिल्लीपासून गोवा आणि उत्तर प्रदेशपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. हे दिवस बदलतील हा दुर्दम्य आशावाद घेऊन प्रियंका उभ्या आहेत.
दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे!
प्रियंका आणि राहुल गांधी ही दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे. त्यांच्या कामाची पद्धतही वेगळी. उताराला लागलेल्या काँग्रेसला सावरण्याचे सगळ्यात मोठे आव्हान आज राहुल गांधींसमोर आहे. काँग्रेसला बुडवण्याचे व आता काँग्रेस राहत नाही या टोकाच्या विचारापर्यंतचे प्रसंग अनेकदा काँग्रेसच्या जीवनात आले. सध्याचा काळ काँग्रेससाठी सगळ्यात कठीण काळ आहे. पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर काँग्रेस लयाला जाणार असे भाकीत केले जात असे. त्यांच्या मृत्यूनंतर 1967 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आठ राज्यांतून उखडली गेली. विरोधकांनी काँग्रेसवर मृत्युलेख लिहून काँग्रेसवर 'अंत्यसंस्कार'ही केले आहेत. पण प्रत्येक पराभवांनंतरही काँग्रेस उभी राहिली.
काळे कायदे मागे घ्यावेच लागतील!' असे सांगणाऱ्या राहुल गांधींचा प्रसारमाध्यमांना सोयिस्कर विसर पडला
गेल्या दहा वर्षांत काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे हे खरे. म्हणून काँग्रेस संपली असे म्हणता येत नाही. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत काँग्रेस पुन्हा विजयी झाली व त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदा मागे घेतले. शेतकऱ्यांशी चर्चा नाही हा निग्रह सोडून गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला. पण 'माझे शब्द लक्षात ठेवा. सरकारला हे तीन काळे कायदे मागे घ्यावेच लागतील!' असे सांगणाऱ्या राहुल गांधींचा प्रसारमाध्यमांना सोयिस्कर विसर पडला. कारण माध्यमे आज स्वतंत्र राहिलेली नाहीत आणि काँग्रेस किंवा गांधींची बाजू प्रभावीपणे मांडतील असे लोकही सभोवती दिसत नाहीत. याला जबाबदार काँग्रेसची परंपरागत कार्यपद्धती आहे. नेते निर्माण करण्याची जबाबदारी घेऊन काम पुढे नेण्याची यंत्रणा बंद पडली आहे. यावर राहुल गांधी यांनी त्यांची वेदना व्यक्त केली.
मी- काँग्रेस पक्षातले जुने लोक नाराज आहेत. काहीजण तर पक्ष सोडून जात आहेत.
राहुल गांधी - 'या जुन्या लोकांना पक्षाने भरपूर दिले. आज पक्षाला त्यांची गरज असताना ते वेगळी भूमिका घेत आहेत. मी काय करू शकतो? तुम्ही दोन नाराजांची नावे सांगा.''
मी - 'कॅ. अमरिंदर सोडून गेले…''
राहुल गांधी - 'ते पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कारकीर्दीत काँग्रेसचा ग्राफ खाली आला. आम्ही एक 'पोल' केला. त्यांना मुख्यमंत्री म्हणून फक्त सहा टक्के लोकांनी पसंती दिली. जे मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नव्हते, त्यांना अमरिंदर यांच्यापेक्षा जास्त पसंती मिळाली. त्यांना हे बोलावून सांगितले. निवडणुकीत जनतेला जी आश्वासने दिली ती पूर्ण करा असे सुचवले. त्यांचा प्रतिसाद थंड होता. काहीतरी करा, नाहीतर पक्षाला कारवाई करावी लागेल असे सांगितले. तेव्हा पक्षातले 'ज्येष्ठ' कॅ. अमरिंदर यांच्या पाठीशी उभे राहिले. कठोर निर्णय घेऊ नका असे मला सांगू लागले. कॅ. अमरिंदर यांना बदलले नसते तर पंजाबात काँग्रेस संपली असती. या ज्येष्ठांचे काय करायचे? मी तर कधीच कोणाचा अनादर केला नाही.'' …
मी -''गुलाम नबी आझाद नाराज आहेत…''
राहुल गांधी - ''त्यांचा मी काय अनादर केला? अनेक वर्षे ते काँग्रेसच्या माध्यमातून सत्तापदावर आहेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. तिथे मुदत संपली तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली. गुलाम नबीजी, आपण जम्मू-कश्मीरला जाऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व्हा. निवडणुका येतील. तुम्ही पुन्हा तिथे मुख्यमंत्री होऊ शकता.''
मी - 'चांगली सूचना होती…!''
राहुल गांधी - 'पण त्यांनी जायला नकार दिला. तिकडे पक्षच अस्तित्वात नाही असे त्यांचे म्हणणे होते. आझादजी त्या प्रदेशाचे मुख्यमंत्री होते, पण त्यांच्या दृष्टीने तिथे काँग्रेस पक्ष अस्तित्वात नाही.''
मी - ''पण आझाद सध्या कश्मीरात जाहीर सभा घेत आहेत.''
राहुल गांधी - ''होय, त्यामागची कारणे वेगळी असावीत.''
टिळकांच्या मार्गाने…
सर्वच राजकीय पक्षांत 'जुन्यांचे काय करायचे?' ही गंभीर समस्या उद्भवली आहे. जुने नव्यांसाठी मार्ग मोकळा करून देत नाहीत व नेतृत्वाची अडवणूक करतात. राहुल गांधीसुद्धा त्याच चक्रात अडकले आहेत. ममता बॅनर्जी यांनी नव्या आघाडीसाठी मांडव स्थापनी सुरू केली. यूपीएच्या अस्तित्वालाच त्यांनी आव्हान दिले. 'त्यांना नेमके काय हवेय? त्यांनी काँग्रेस आणि माझ्यावर कितीही टीका केली तरी मी त्यांच्यावर बोलणार नाही!'' असे गांधी म्हणाले. पाच राज्यांत महत्त्वाच्या निवडणुका आहेत. काँग्रेस पक्ष एका नव्या वळणावर अस्तित्वाची लढाई लढत उभा आहे. काँग्रेसचे अस्तित्व या क्षणी संपवून टाकणे म्हणजे देशाच्या संसदीय लोकशाहीचे अस्तित्व संपवण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षाला नेमके तेच घडावे असे वाटत आहे.
काँग्रेस स्थापना दिवसानिमित्त
राहुल गांधी मुंबईत येतील. त्यांच्या भाषणातून ते काय संदेश देतात ते पाहायला हवे. काँग्रेस स्थापनेस 136 वर्षे होत आहेत, पण काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली, परंतु ती एकदम अचानक स्थापन झाली नाही. काँग्रेसच्या स्थापनेला फार मोठी पार्श्वभूमी आहे, इतिहास आहे. काँग्रेसमध्ये चैतन्य आले ते लोकमान्य टिळकांच्या उदयानंतर. त्यांनी काँग्रेस पक्ष बैठकीच्या हॉलमधून बाहेर काढून मैदानात आणला.
काँग्रेसवरची त्यांची पकड वाढतच गेली. मवाळांना त्यांनी पराभूत केले
'मराठा', 'केसरी' ही मतपत्रे काढून त्याद्वारे जनजागृतीला सुरुवात करून स्वदेशीची चळवळ सुरू केली. राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वदेशी व स्वराज्य हा नवीन चतुःसूत्री कार्यक्रम देशाला दिला. सतत ब्रिटिश सरकारवर हल्ले सुरू ठेवले. शिवाजी उत्सव आणि गणपती उत्सव हे सार्वजनिक स्वरूपात पुढे आणले आणि त्यांच्यामार्फत देशाभिमान आणि धर्माभिमान जागृत केला. इंग्रज राजवटीची चिरफाड केली. त्यांची विद्वत्ता, व्यासंग, बेडरपणा आणि कृतिशीलता यामुळे तरुण वर्ग काँग्रेसकडे आकर्षित झाला. सशस्त्र क्रांतिकारकांना त्यांनी गुप्तपणे मदत केली. अगोदर स्वातंत्र्य आणि नंतर समाजसुधारणा अशी भूमिका घेऊन स्वातंत्र्याच्या ध्येयावर सर्व लक्ष केंद्रित केले. त्यांचा त्याग, त्यांनी सोसलेला कारावास यामुळे त्यांचे महत्त्व वाढत गेले. काँग्रेसवरची त्यांची पकड वाढतच गेली. मवाळांना त्यांनी पराभूत केले. जहालांचे ते एकमेव प्रतीक झाले आणि ज्या वेळी त्यांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी उत्स्फूर्त घोषणा केली, त्यावेळी देश ढवळून निघाला. तेल्या-तांबोळ्यांचे ते पुढारी झाले. लोक त्यांना 'टिळक महाराज' म्हणू लागले. देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांचे प्रचंड स्वागत होऊ लागले. लोकमान्यांनी थंड गोळ्यात चैतन्य आणले. स्वराज्याची चळवळ फोफावली.
आम्ही कुठल्याही बाबतीत इंग्रजांपेक्षा कमी नाही
टिळकांची ही कामगिरी असामान्य होती. त्यांनी काँग्रेसचे स्वरूप संपूर्णतः बदलून टाकले. इंग्रज सरकारला अर्ज-विनंत्या करण्याचे काँग्रेसचे राजकारण त्यांनी संपुष्टात आणले. त्यांनी काँग्रेसला खऱ्या अर्थाने राजकीय क्रांतीचे शस्त्र बनवले. प्रखर राष्ट्रवाद लोकमान्यांनी काँग्रेसला दिला. स्वदेश, स्वधर्म याविषयी स्वाभिमान त्यांनी वाढवला. इंग्लंडच्या वैभवाने दिपून गेलेल्या हिंदुस्थानात जो न्यूनगंड निर्माण झाला होता तो जर कोणी नष्ट केला असेल तर लोकमान्यांनी. आम्ही कुठल्याही बाबतीत इंग्रजांपेक्षा कमी नाही, उलट पाच हजार वर्षांची आमची हिंदुस्थानी संस्कृती पाश्चात्त्य संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे हा अभिमान त्यांनी निर्माण केला. हिंदुस्थानी जनतेमध्ये स्वतःबद्दलचा विश्वास आणि स्वाभिमान निर्माण केला.
काँग्रेस पक्ष टिळकांच्याच मार्गाने वाचवता येईल
राहुल-प्रियंका या भाऊ-बहिणीपुढे काँग्रेसला वाचविण्याचे आव्हान आहे. काँग्रेस पक्ष टिळकांच्याच मार्गाने वाचवता येईल. प्रखर राष्ट्रवाद, भाजप-मोदींच्या वैभवाने दिपून गेलेल्या, खोट्या झगमगाटाने प्रभावित झालेल्या समाजात जो न्यूनगंड निर्माण झाला आहे, तो दूर करावा लागेल. या लढ्याचे रणशिंग कोणी फुंकेल काय?
हेही वाचा - 'नेमकचि बोलणें' पंतप्रधानांना भेट देऊ; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका