मुंबई - मुंबईतील शिवाजी पार्कवर स्मृतिस्थळं ( Dadar Shivaji Park ) बनविण्यास तसेच अंत्यसंस्कार न करण्यासंदर्भातील जनहित याचिका ( Shivaji Park PIL ) आज मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai Highcourt ) दाखल करण्यात आली आहे. येथील रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी अॅड. प्रकाश सालसिंगिकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
काय म्हटले आहे जनहित याचिकेत -
दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर राजकीय तसेच प्रसिद्ध व्यक्तींच्या स्मारक तथा अंत्यसंस्कार करिता जागा उपलब्ध करून देणे तसेच त्यांना परवानगी देणे, थांबवण्यात यावे तसेच हे मैदान खेळण्यासाठी असल्यामुळे त्या ठिकाणी इतर कुठलेही गोष्टींसाठी उपलब्ध करून देण्यात येऊ नये, याकरिता जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार केल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण देखील होते, असेही या याचिकेत म्हटले आहे. शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणात मुलं खेळत असतात. हे मैदान पहिल्यापासूनच दादरमधील मुलांना खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी फक्त मुलांना खेळण्यासाठी हे मैदान उपलब्ध राहावे, इतर कुठल्याही कामाकरिता मैदान उपलब्ध करून देऊ नये, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. या मैदानावर खेळाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी करण्यास परवानगी देऊ नये, अशी जनहित याचिका उच्च न्यायालयात केली आहे.
शिवाजी पार्क संदर्भात यापूर्वी न्यायालयाच्या सूचना -
- खेळांव्यतिरिक्त वर्षभरातील ३० दिवस या मैदानाचा इतर कार्यक्रमांसाठी वापर करता येईल.
- या ३० दिवसांमध्ये दसरा मेळावा, मनसेचा गुढी पाडव्यानिमित्त होणारा मेळावा यांचाही समावेश
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, नौदल दिन, १ मे व २६ जानेवारी हे दिवस वगळून इतर दिवशी हे मैदान खेळण्यासाठी वापरले जाईल.
- एखादा शासकीय कार्यक्रम मैदानावर घ्यायचा असल्यास तो विशेष अधिकारात घेण्याची तरतूद आहे.