मुंबई - नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईसह राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने १२ ते १३ हजार प्रतिदिन वाढत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. शासकीय, आरोग्य कर्मचारी हे कोरोना नियंत्रण, काँटॅक्ट ट्रेसिंग आणि उपचाराच्या कामात गुंतले आहेत. आजही नागरिक कोरोना चाचणी करून घ्यायला घाबरत आहेत. पण तसे न करता नागरिकांनी पुढे येऊन कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
हेही वाचा - सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी प्राणघातक कोविड विषाणूचा सामना करणारी लस
आज बाधित होणाऱ्या ८० टक्के लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, त्यांना होम क्वारंटाईन होण्यास परवानगी दिली तर ते मला काहीच होत नाही असे वाटून बाहेर फिरतांना दिसत आहेत, त्यामुळे कुटुंब च्या कुटुंब बाधित होताना दिसत आहेत. त्यांना काही होत नाही पण घरातलीच एखादी व्यक्ती त्यामुळे गंभीर झाली तर काय करणार? असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विचारले
नाईलाजाने कडक निर्णय
कोरोनाची ही लाट वाढू नये, शिखर पातळीवर जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आपल्याकडे पुरेशी आरोग्य सुविधा आज तरी उपलब्ध आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांना मास्क लावणे, अंतर ठेवणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन करावेच लागेल, लस घेतली तरी ही त्रिसुत्री पाळावी लागेल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले
हेही वाचा - धक्कादायक! मळणी मशीनमध्ये साडीचा पदर अडकून महिला ठार
गर्दी असेल तेथे निर्बंध
राज्य लॉकडॉऊनच्या उंबरठ्यावर असताना जिथे गर्दी होते तिथे कार्यालयांमध्ये, हॉटेल्स आणि अन्य ठिकाणी नवीन बंधने घालावीच लागतील, येत्या काही दिवसात यासंबधीचे निर्णय होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच आवश्यकता असेल तर शासनाच्या परवानगीने लॉकडाऊन लावण्याच्या सुचना आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
त्रिसूत्रीचे पालन करा
दुसऱ्या लाटेचा जगभरातील अनुभव फार वाईट आहे, ब्राझीलसारख्या देशात मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे, तिकडे हाहाकार झाला आहे. तिथली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडत आहे. ती परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रात अजिबात येऊ द्यायची नाही, आपल्याकडे पुन्हा लॉकडाऊन लागू द्यायचं नाही, त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त, त्रिसुत्रीचे पालन करून शासनाला सहकार्य करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.