मुंबई - मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन असलेला बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. या उपक्रमाचा तोटा कमी करण्यासाठी बेस्टमध्ये खासगी बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता वीजबिघाड दुरुस्तीचे काम खासगी कंत्राटदाराला देण्याचा बेस्टचा निर्णय घेतला आहे. वीज बिघाड दुरुस्तीसाठी ४८ लाखांचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्राटावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परिवहन विभागात खासगीकरण -
मुंबईकारांकडून वाहतुकीसाठी बेस्टच्या बसेसचा वापर केला जातो. बेस्टकडे स्वतःच्या ३ हजार, ८०० कंत्राटदाराच्या, १ हजार एसटी बस असा एकूण ४८०० बसचा ताफा आहे. कंत्राटदाराच्या बसमध्ये कंत्राटदाराचा ड्रायव्हर नियुक्त केला आहे. आता कंडक्टरही कंत्राटदाराचा नियुक्त केला आहे. बेस्टने परिवहन विभागातील बसची पुनर्बांधणी, रंगकाम, साफसफाई आदी कामे कंत्राटदारकडून करून घेण्यास सुरुवात केली आहे. तर विद्यूत विभागात रस्त्यावर खड्डे खोदण्याचे काम कंत्राटदाराकडून केले जात आहे.
विद्युत विभागातही खासगीकरण -
आता बेस्ट उपक्रमाने वीजबिघाड दुरुस्तीसाठी खासगी कंत्राटदाराला नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या विद्युत केबलमधील दुरुस्तीसाठी 'एसव्हीएस इलेक्ट्रिक' या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. केबल नादुरुस्त झाल्यास रस्ता खोदून ती दुरुस्त करणे आणि त्यानंतर रस्त्यावरील खड्डा बुजवणे यासाठी ४८ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. केबल दुरुस्तीचे काम खासगी कंत्राटदाराला देऊन बेस्टने आपल्या विद्यूत विभागातही खासगीकरणाला सुरुवात केली आहे. यावरून बेस्ट समितीत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.