मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यात येत आहेत. हे प्रमाण सध्या कमी असून लवकरच या उपचार पद्धतीचा वापर वाढणार आहे. त्यामुळे आता प्लाझ्मा दात्यांची संख्याही वाढवण्याची गरज आहे. हीच गरज ओळखत आता मुंबईतील काही खासगी डॉक्टर पुढे आले असून त्यांनी 'प्लाझ्मा दो ना' नावाने एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार सोशल मीडियावर माहिती देत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार करण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉक्टरांनी हाती घेतले आहे.
कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा वापरून उपचार केल्यास रिकव्हरी रेट वाढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच आता राज्यभर प्लाझ्मा सेंटर वाढवण्यात आले आहेत. पण त्याचवेळी प्लाझ्मा दान करण्याविषयी जनजागृती होत नसल्याने गैरसमज आणि भीतीचे वातावरण आहे. यामुळे रिकव्ह झालेले रुग्ण प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. आता प्लाझ्मा सेंटर्स वाढल्याने प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढली तरच प्लाझ्मा थेरपी करता येणार आहे. यामुळेच देवनार येथील डॉ.क्षितीजा राव यांनी काही डॉक्टर मित्रांच्या मदतीने 'प्लाझ्मा दो ना' ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत सोशल मीडिद्वारे प्लाझ्मा दान करण्याची माहिती देत आहेत. प्लाझ्मा देण्याविषयी जनजागृती नसल्याने बरे झालेले रूग्ण पुढे येत नसल्याचे लक्षात आले. त्यातूनच ही मोहीम सुरू केल्याची माहिती डॉ.राव यांनी दिली आहे. सध्या आपण नायर रुग्णालयाला प्लाझ्मा दाते मिळवून देण्यासाठी मदत करत आहोत. येत्या काळात अन्य रुग्णालयांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर 15 दिवसांनी चाचणी केली नसेल, मात्र डिस्चार्ज मिळून एक महिना झाला असेल, तर त्या रुग्णाला प्लाझ्मा देता येतो. आता असे रूग्ण आता हळूहळू पुढे येत आहेत. ही संख्या लवकरच वाढेल, असा विश्वास डॉ.राव यांनी व्यक्त केला आहे.