मुंबई - राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सध्या अनेक दिग्गज नेत्यांच्या मागे ईडी(enforcement directorate)च्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले. त्यानंतर भाजपाकडून पाटील यांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा - ई़डी प्रकरण : 'राजकीय नेत्यांना त्रास देणं ही भाजपाची जुनी सवय'
भाजपामध्ये घेण्यासाठी टाकलेला दबाव
केंद्रात २०१४पासून भाजपाची सत्ता आल्यानंतर ईडी, सीबीआय आणि एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणा जनमानसात नावारुपाला आल्या. अगदी ठरवून या संस्थांचा वापर केला जातो आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. हवे तेव्हा आणि हवे त्याच्याविरोधात ईडीचा फास आवळायचा असे एकूण चित्र सध्या तरी राज्यात दिसत आहे. राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आघाडी सरकारच्या अनेक मातबर नेत्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी झाली होती. नुकतेच भाजपा सोडून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांची नऊ तास चौकशी चालली. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी करण्यात आली. नुकतेच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना ईडीने चौकशी बोलावले होते. तपास यंत्रणांचा हा चौकशीचा भाग असला, तरी पाटील यांना भाजपाच्या गोटात सामील करून घेण्यासाठी टाकलेला दबाव आहे, असे भाकीत राजकीय विश्लेषक अजय वैद्य वर्तवतात.
ईडीच्या चौकशीमागे भाजपाचे षडयंत्र
मंत्रिपदी केंद्रात वर्णी लागलेले नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, कालपरवा दाखल झालेले कृपाशंकर सिंह यांच्यासह अनेक मातब्बर नेते चौकशीच्या भीतीने भाजपामध्ये सामील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले खडसे यांना दोन दिवसापूर्वी ईडीची नोटीस देण्यात आली. त्या पाठोपाठ मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनाही अशाच प्रकारची नोटीस आली असून त्यांनाही चौकशीसाठी बोलावले. सरकारला खरेच भ्रष्टाचार काढायचा असेल तर पक्षभेद न ठेवता सर्वांवरच कारवाई व्हायला हवी. परंतु पश्चिम बंगालच्या निवडणुका असो किंवा आताच्या स्थितीतील घडामोडी पहिल्या असता, विशेष करून विरोधी पक्षातील नेत्यांना नोटिसा देऊन केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणायचा आणि त्यांना भाजपामध्ये प्रवेश घेण्यास भाग पाडायचे असे चित्र या चौकशी मागे दिसते, असा आरोप भारतीय जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केला. तसेच केवळ आकसापोटी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई केली जाते. मात्र भाजपाच्या गोटात सामील झाल्यानंतर चौकशी थांबते. हा दबावतंत्रांचा भाग असून तो निषेधार्ह आहे, असे नारकर म्हणाले.
हेही वाचा - ईडी कार्यालयाला टाळे ठोकायची वेळ; शिवसेनेचा संताप
नेमके प्रकरण काय?
मुंबई क्राइम ब्रांचने 2015साली दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांना अटक केली होती. डोंबिवलीत राहणारा विपीन पाटील हा मोठा दारू विक्रेता आहे. दयानंद जाटान आणि विपीन पाटील या दोघांवर गंभीर आरोप आहेत. दयानंद आणि विपीन हे ठाणे जिल्ह्यातील कोणत्या व्यक्तीकडे जास्त पैसे आहेत, कोणत्या बिल्डरचे काम सुरू आहे, कोणत्या नेत्याला धमकी दिल्याने फायदा होईल, अशाबाबतची सर्व माहिती कुख्यात डॉन रवी पुजारीला द्यायचे. मनसे आमदार राजू पाटील यांना मारण्याची सुपारीही पुजारीला दिली होती. त्यासाठी 15 लाख रुपये पुजारीला पाठवले होते. आता पुजारीला अटक झाल्यानंतर संबंधित सगळ्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविण्यासाठी ईडीने बोलावले होते, अशी माहिती मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिली. तसेच दबावाच्या प्रकरणाचा पाटील यांनी इन्कार केला, ईटीव्ही भारतशी ते बोलत होते.