मुंबई - मुंबई महानगरपालिका आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यानंतर फडणवीस शिंदे जोडी मुंबई महानगरपालिकेत 150 जागा जिंकून झेंडा फडकवतील असा दावा केला आहे. अमित शहा यांनी ट्विटद्वारे हा दावा केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जोरदार तयारी सुरू केल्याचे दिसत आहे (Preparations for BMC elections ). मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचीही तयारी सुरू झाली आहे. बुधवारी मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली आहे (meeting on Matoshri on Wednesday).
बुधवारी शिवसेनेची बैठक - महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवारी मातोश्रीवर एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुंबईतील सर्व विभाग प्रमुख आणि महिला संघटना बोलावण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. शिंदे गटाने तसेच भाजपने दिलेल्या आव्हानाला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने नेहमीप्रमाणे बूथ पातळीवर संघटना आणि पक्ष मजबूत करण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत.
मनसे शिंदे गटाची संभाव्य युतीबाबत दक्षता - मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सध्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने बैठकांचे सत्र सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदे गट आणि मनसे एकत्र आल्यास काय चित्र निर्माण होईल आणि त्याचा परिणाम निवडणुकांवर कसा होईल याचा अंदाज घेऊन शिवसेनेने त्याप्रमाणे आखणी करण्यास सुरुवात केली आहे. जनमत जास्तीत जास्त शिवसेनेच्या बाजूने वळवण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने बाळासाहेबांचे विचार आणि पाठीत खंजीर या वाक्यांचा उच्चार करीत आहेत.
हेही वाचा - Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी!