मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या भीतीने नागरिक चाचण्या करण्यासाठी धाव घेत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्या करण्यास परवानगी दिलेल्या खासगी लॅबने लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्या करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिकेने दिले आहेत. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे.
मुंबईत गेल्या वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढला आहे. रुग्ण वाढत असल्याने पालिकेने चाचण्या वाढवल्या आहेत. कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी पालिकेने काही खासगी लॅबला देखील परवानगी दिली आहे. मात्र खासगी लॅबकडून कोरोना चाचण्या करताना सरसकट चाचण्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्या आधी करा, असे निर्देश महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत.
रुग्णांचे अहवाल प्रथम पालिकेला देण्याच्या सूचना
खासगी लॅबकडून ज्या चाचण्या केल्या जातात त्याचे अहवाल वेळेवर पालिकेकडे दिले जात नाहीत. पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल थेट रुग्णांना दिले जातात. यामुळे रुग्ण थेट रुग्णालयात खाटा मिळण्यासाठी प्रयत्न करतात. असे केल्याने रुग्णांना खाटा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. रुग्णांना खाटा या पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमद्वारे उपलब्ध केल्या जातात. यासाठी खासगी लॅबने दुपारी २ पर्यंत केलेल्या चाचण्यांचे अहवाल आयसीएमआरच्या वेबसाईटवर अपलोड केल्यावर, रात्री १२ वाजेपर्यंत पालिकेला कळवावेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते अहवाल रुग्णांना द्यावेत. असे केल्याने रुग्णांना खाटा उपलब्ध करून देणे पालिकेला शक्य होईल, अशा सूचना महापालिकेच्या वतीने खासगी लॅबला देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - नाशकात मिनी लॉकडाऊनला सुरूवात; बाजारपेठेत शुकशुकाट