मुंबई - राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा निर्माण झालेला प्रचंड तुटवडा पाहता गुजरातमधील निर्यातदार औषधी कंपन्यांना पुरवठा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे. राज्य सरकारने जर रेमडेसिवीरच्या वितरणासाठी परवानगी दिली नाही, तर सविनय कायदेभंग करून लोकांना इंजेक्शन वाटू असाही इशारा सरकारला दिल्याचे दरेकर यांनी माध्यमांना सांगितले.
रेमेडेसिवीर पुरवठ्याबाबतची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी व राज्यातील रुग्णांना तातडीने रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रविण दरेकर यांनी अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे. दरेकर यांनी मंत्री शिंगणे यांची गुरुवारी भेट घेऊन ही पत्राद्वारे मागणी केली आहे.
हेही वाचा-मुंबईमध्ये आयसीयू अन् व्हेंटिलेटर बेडची कमतरता
राज्यात 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध आश्वासन-
मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर दरेकर यांनी माध्यमांना माहिती दिली की, राज्यात 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबतचे आश्वासन आम्ही दिले आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातच्या फार्मा कंपनीच्या मालकांची राज्याच्या आरोग्य आणि औषध प्रशासन मंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हेही वाचा-राज्यात 61 हजार 695 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू
राज्य सरकारने परवानगी दिली रेमडेसीवीरच्या तुटवड्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागणार
प्रवीण दरेकर म्हणाले की, गुजरातच्या ब्रोफ फार्मा कंपनीच्या मालकांशी चर्चा केली आहे. यावेळी एक्सपोर्टचे डिस्ट्रिब्यूटरही होते. निर्यात थांबवली असल्यामुळे तो माल आपल्या राज्यात विकायला परवानगी द्या, अशी विनंती त्यांनी केली आहे. या इंजेक्शनचे रोज 20 हजार एवढे उत्पादन होते, असे फार्मा कंपनीच्या मालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने परवानगी दिली तर राज्यात निर्माण झालेल्या रेमडेसीवीरच्या तुटवड्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागणार आहे, असा दावा त्यांनी केला.
आरोग्य मंत्र्यांचाही सकारात्मक प्रतिसाद-
सरकारच्या प्रतिसादाबाबत दरेकर म्हणाले की, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. तेही या दृष्टीने सकारात्मक पाठिंबा देत आहेत. परवानगीबाबत मी राजेंद्र शिंगणे यांना पत्र दिलेले आहे. शिवाय गुजरात सरकारने कशा पद्धतीने परवानगी दिली, याचाही दाखला मी पत्रात दिलेला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांचेही केंद्राशी बोलणे सुरू आहे. पण राज्य सरकारने पररवानगी दिली तर तातडीने पुरवठा होऊ शकतो. शिंगणे यांनी तरी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्यामुळे त्यांचा आभारी आहे. कोणत्याही अडचणी येणार नाहीत, सरकारने परवानगी दिली पाहिजे. पण जर सरकारने परवानगी दिली नाही तर, सविनय कायदेभंग करून लोकांना या इंजेक्शनचे वाटप करू, याचीही कल्पना मी मंत्र्यांना दिली आहे.