मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांची आज सांताक्रूझ येथील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नसल्याचे म्हटले आहे.
दरेकर म्हणाले, 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही असे दरेकर यांनी म्हणत राजकीय चर्चेला पूर्ण विराम दिला.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची तयारी..? संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त भेट