मुंबई - किरीट सोमैया यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट ( Pravin Darekar Meets Governor Bhagat Singh Koshyari ) घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, शिवसेनेच्या गुंडांनी भाजप नेते किरीट सोमैया यांना संपवण्याचा कट रचला आहे. CISF चे जवान होते म्हणून किरीट सोमैया वाचले. अन्यथा त्यांचा जीव गेला असता, असेही ते म्हणाले.
बनावट एफआयआर तयार करण्यात आला! - याप्रसंगी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, किरीट सोमैया यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली. सरकार पोलिसांवर दबाव आणून दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याबाबत त्यांनी राज्यपालांना सुद्धा अवगत केले आहे. किरीट सोमैया यांनी दिलेला एफआयआर पोलीसांनी घ्यायला नकार दिला व कशा प्रकारे त्याच्या व्यतिरिक्त एक बनावट एफआयआर तयार करून त्यात किरीट सोमैया यांना गोवण्यात आले याविषयी सुद्धा त्यांनी राज्यपालांना माहिती दिली.
चोर चोर उलटा कोतवाल को डाटे! - किरीट सोमैया यांच्या गाडीवर हल्ला झाला व गुहा मात्र किरीट सोमैया यांच्या ड्रायव्हर वर नोंदवण्यात आला. याची माहिती सुद्धा राज्यपालांना दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कशा पद्धतीने गुंडांनी हल्ला केला हे सर्व दिसत आहे. परंतु त्यांच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला नाही, अखेर आमचा वाढता दबाव बघून माजी महापौर महाडेश्वर यांच्यावर एफआयआर दाखल झाला. परंतु नंतर त्यांची त्वरित जामिनावर सुटका सुद्धा करण्यात आली. खार पोलीस स्टेशन मध्ये माझ्या जीवाला धोका आहे असं किरीट सोमैया यांनी स्वतःहून सांगितलं होतं. परंतु पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या दबावाखाली हे सर्व सुरू होतं. याची गंभीर दखल राज्यपालांनी घ्यावी अशी विनंती राज्यपालांना केल्याचं त्यांनी सांगितले.
सरकार सूडाच्या भावनेने पेटलेले आहे! - या सर्व गोष्टी लोकशाहीला घातक असून किरीट सोमैया यांना झेड सिक्युरिटी आहे. आणि अशामध्ये सुद्धा त्यांच्यावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य लोकांनी जगायचं कसं? हा प्रश्न सुद्धा त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. याउलट पोलीस आयुक्त संजय पांडे असे म्हणतात की सीआयएसएफ जवान काय करत होते. म्हणजे त्यांची इच्छा काय आहे. सीआयएसएफ जवान यांनी त्या प्रसंगी गोळीबार करायला हवा होता का? जर त्यांनी तसा केला असता तर महाराष्ट्र पोलिस यांच्यामध्ये व त्यांच्या जुंपली असती. असं होणं अपेक्षित होतं का? केवळ सीआयएसएफ चे जवान होते म्हणूनच किरीट सोमैया यांचा जीव वाचला,अन्यथा त्यांचा जीव गेला असता. कारण मुंबई पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. या सर्व प्रकरणाबाबत आम्ही गृहमंत्री तसेच गृहसचिव यांना भेटलो. परंतु सरकार याकडे लक्ष देईल असे मला वाटत नाही. सरकार सूडाच्या भावनेने पेटलेल आहे. ज्या पद्धतीने किरीट सोमैया महाराष्ट्रातील नेत्यांचे, मंत्र्यांचे एकामागून एक घोटाळे बाहेर काढत आहेत, म्हणून किरीट सोमैया यांना नष्ट करा, त्यांना गायब करा, म्हणजे प्रश्न उरणार नाही. या भीतीपोटी हे सर्व प्रकार चालू असल्याचा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला.