मुंबई - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षात इनकमिंग सुरू झाले आहे. सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यावर भाष्य केले होते. राष्ट्रवादी म्हणजे रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष, असे म्हणत खालच्या शब्दांत टीका केली होती. यावर राष्ट्रवादीकडून याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. दरेकर यांनी माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्यांचा गाल आणि थोबाडही रंगवू शकतो, याची जाणीव ठेवावी, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांना दिला आहे.
हेही वाचा - पवई तलावात गणेश विसर्जनादरम्यान मगरीचे दर्शन
- काय आहे प्रकरण?
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि शांताबाई फेम गायक संजय लोंढे यांच्यासह काही कलाकार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. या प्रवेशाबाबत प्रवीण दरेकर यांनी पुण्यातील शिरुरमध्ये राष्ट्रवादीवर टीका केली होती. राष्ट्रवादीला गरीब माणसांकडे बघायला वेळ नाही, कारण राष्ट्रवादी हा पक्ष रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, अशा आक्षेपार्ह शब्दात त्यांनी टीका केली.
शिरूर येथे राजे उमाजी नाईक यांच्या 230 व्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात दरेकर बोलत होते. दरेकरांच्या वक्तव्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादीकडून दरेकर यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
- रुपाली चाकणकर यांची दरेकरांवर टीका -
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहात. हे सभागृह वरिष्ठ आणि ज्येष्ठांचे सभागृह आहे. परंतु आपण ज्या पद्धतीचे वक्तव्य केले यावरून तुमचा वैचारिकतेशी, अभ्यासाशी काहीही संबंध नसल्याचे दिसून येते, असा घणाघात राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. तुमच्या वक्तव्याचा संकोच वाटतो. राष्ट्रवादीवर आरोप करताना आपल्या पक्षाची पार्श्वभूमीवर तपासा. तुमच्या पक्षात सातत्याने महिलांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे. काहीजण महिलांचे कैवारी असल्याचा आव आणत असल्याचे सांगत चित्रा वाघ यांचे नाव न घेता त्यांचाही समाचार चाकणकर यांनी घेतला. दरेकर यांनी माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्यांचा गाल आणि थोबाडही रंगवू शकतो, याची जाणीव ठेवावी, असा इशारा चाकणकर यांनी दरेकर यांना दिला आहे. त्यामुळे आता भाजपकडून काय प्रत्युत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील ११ जण बुडाले; तिघांचे मृतदेह सापडले