मुंबई - शिवसेना नेते, मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते आज आयोध्या दौऱ्यावर आहेत. याविषयी बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या दौऱ्यावर टीका करताना, शिवसेना हिंदुत्वापासून फार दूर गेली आहे व हिंदुत्ववादी जनतेला पुन्हा आपल्याकडे आणण्याचा शिवसेनेचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे सांगितले आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत होते.
हिंदुत्व अधोरेखित करण्यासाठी - याप्रसंगी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की 'शिवसेनेचा अयोध्या दौरा एक देखावा आहे. शिवसेना हिंदुत्वापासून फार दूर गेलेली आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी जनता आपल्याकडे करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना करत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधारा शिवसेनेला पटलेली नाही आहे, म्हणून पुन्हा एकदा हिंदुत्व अधोरेखित करण्यासाठी अशा प्रकारचा दौरा आदित्य ठाकरे यांनी केला असल्याचं दरेकर यांनी सांगितलेल आहे.
धरणे, मोर्चे लोकशाहीला घातक? - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडी समोर चौकशीला जावे लागत आहे, यावर प्रवीण दरेकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, राहुल गांधी असो की देशालातला लहान माणूस, कायदा सर्वांना समान आहे. तपास यंत्रणा कधीच असा भेदभाव करत नाही. त्यांना सामोरे जावे लागते. राहुल गांधी यांच्या विषयी तपास यंत्रणेकडे काही पुरावे असतील म्हणून त्यांनी ही कारवाई केली आहे. हा तपास यंत्रणेचा भाग आहे. भाजप विरोधी दंडेलशाही सुरू आहे. पश्चिम बंगाल-महाराष्ट्रात तपास यंत्रणा कारवाई करतात. तेव्हा यंत्रणाना प्रभावी करण्यासाठी मोर्चे, धरणे काढले जातात. दबावतंत्राचा वापर केला जातो. हे लोकशाहीला घातक असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.