मुंबई - पश्चिम उपनगरासाठी असलेल्या मेट्रो-२ आणि मेट्रो-७ या दोन्ही मेट्रो लाइनची चाचणी आज करण्यात आली. चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांची तसेच विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांची नावे होती. परंतु, ज्यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची पायाभरणी झाली व बहुतांश कामे पूर्ण झाले त्या विधानसभेचे विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर टाकण्यात आले नसल्या कारणाने, यावरून भाजपाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
कार्यक्रमास्थळी भाजपाकडून निषेध आंदोलन
कार्यक्रमास्थळी भाजपाने निषेध आंदोलनही आज केले. याविषयी प्रतिक्रिया देताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीसांनी या प्रकल्पासाठी दिवसरात्र परिश्रम घेतले. रात्रीच्या 2 ते 3 दरम्यान देखील देवेंद्र फडणवीसांनी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत. महाविकास आघाडीने श्रेय घ्यावे, मात्र ज्यांनी प्रकल्पाचा पाया रचला किंबहुना प्रकल्प पूर्णत्वास नेला, त्यांना कार्यक्रमाला बोलावणे गरजेचे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात असे कधी झाले नाही.
'आम्ही सर्वांनीच सरकारचा निषेध केला'
मात्र गेल्या काही दिवसांपासून चुकीचा पायंडा महाविकास आघाडी सरकारकडून पाडला जात आहे. म्हणून दोन्ही कार्यक्रमांवर आम्ही बहिष्कार घातलेला आहे. माझे नाव पत्रिकेवर आहे. पण प्रकल्पाचे जनक असलेले आमचे नेते देवेंद्रजींना जाणीवपूर्वक टाळल्याबद्दल माझा उपस्थित राहण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उलट आम्ही सर्वांनीच सरकारचा निषेध केला आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - २०२०-२१मध्ये देशाच्या जीडीपीमध्ये ७.३ टक्क्यांची घसरण!