मुंबई - विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई बँक फसवणूक प्रकरणात रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात प्रवीण दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे. आता रमाबाई पोलीस स्टेशन कडून प्रवीण दरेकर यांना 4 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे.
दरेकरांनी 20 वर्षे फसवणूक केली - आम आदमी पक्षाच्या वतीने धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर नसतानाही प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँक संचालक पदाची निवडणूक लढवली. त्या माध्यमातून दरेकर यांनी मुंबै बँकेचे ठेवीदार प्रशासन आणि सरकार यांची 20 वर्षे फसवणूक केली असा आरोप दरेकर यांच्यावर आहे. प्रवीण दरेकर यांना सोमवारी (दि.04) रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश आहेत. प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून 1997 पासून मुंबै बँकेवर निवडून येत आहेत. दरेकर हे नागरी सरकार बँक आणि मजू अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. त्याची मुंबै बँकेवर संचालक म्हणूनही बिनविरोध निवड झाली होती. प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर यांना अपात्र ठरवले आहे.
दोन आठवड्यांचा दिलासा - प्रवीण दरेकर यांनी आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. प्रविण दरेकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा दिलासा दिलासा दिला आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर 29 मार्च रोजी हायकोर्टात वेळेअभावी सुनावणी पार पडू शकली नाही. त्यामुळे दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण? - 20 वर्षे मजूर प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर निवडून येणारे प्रवीण दरेकर हे मजूर नाहीत. अशी तक्रार आपचे नेते धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीअंती 3 जानेवारी 2022 रोजी विभागीय सहनिबंधकांनी प्रवीण दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवलं. त्यानंतर शिंदे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलीसांनी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याविरोधात दरेकरांनी हायकोर्टात धाव घेत गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र दरेकरांना अटकेपासून कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांना रितसर अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते.