मुंबई - कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवत असून आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रीय यंत्रणा आपल्यावर दबाव आणत आहेत. तसेच खोटे चॅट्स पसरविण्यात येत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. नवाब मलिक यांचा कांगावा असून स्वतःची कृत्य बाहेर पडू नयेत म्हणून त्यांनी चालविलेला हा प्रयत्न असल्याचे प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची पत्रकारपरिषद पार पडली. केंद्रीय यंत्रणा आपल्यावर दबाव आणत असून केंद्रीय अधिकारी आपल्या संदर्भातील खोटे चॅट्स पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे आपण दुबईत असताना आपल्यावर पाळत ठेवली जात होती. आपल्या नातवाची शाळा कुठे आहे, याची माहिती घेतली जात आहे. त्यामुळे आपल्याला धोका असल्याचा आणि अडकवले जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
आपली कृती लपवण्यासाठी मलिकांचा कांगावा -
नवाब मलिक यांना कदाचित त्यांनी भूतकाळात केलेल्या गैरकृत्यांचा भंडाफोड होण्याची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते सध्या भयभीत झाले असून होणाऱ्या कारवाईच्या भीतीपोटी ते एक ग्राऊंड तयार करीत आहे. आपला अनिल देशमुख करण्यात येईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. मलिक यांनी स्वतच एक आखाडा तयार केलाय व त्या आखाड्यात स्वतच लोळत आहेत. कारण त्या आखाड्यात दुसरा कोणी कुस्ती खेळायला येत नाही. न्यायालयाने त्यांना तंबी दिल्यानंतरही तरीही ते आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप करणे म्हणजे खाई त्याला खवखवे, अशी त्यांची स्थिती झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.